केडगाव/यवत -दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर चौफुल्याजवळील वाखारी (ता.दौंड) येथे खासगी (लक्झरी) बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात होऊन एका पोलीस कर्मचाऱ्यांसह चार जणांचा मृत्यू झाला तर 25 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 1) पहाटे पाचच्या सुमारास घडला. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात खासगी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन दिलीप शिंदे (वय 36 रा. ढमाळवाडी, भेकराई नगर, पुणे), अमर मानतेश कलशेट्टी (वय 20 रा. गोगाव, सोलापूर), गणपत मल्लाप्पा पाटील (वय 55, रा. कात्रज, पुणे), आरती अंबाना बिराजदार (वय 30, रा. घुलेवस्ती, हडपसर, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. यामधील मृत नितीन दिलीप शिंदे हे पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी होते. शुभम संजय सुरवसे (वय 25 रा. हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खासगी बसचालकाचे नाव आहे.
तर आकाश शिवाजी चव्हाण (वय 27, रा. हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. वाखारीच्या हद्दीत पुणे-सोलापूर हामार्गावर सोलापूर बाजूकडून पुण्याच्या बाजूला जाणाऱ्या खासगी बस (एमएच 12 केक्यू 6696)चे टायर फुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेन (एम.एच12 केपी 6650)वर जाऊन आदळली.
या अपघातात बसचा एक भाग चक्काचूर झाला आहे. यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना यवत पोलीस महामार्ग पोलीस आणि ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.