शिंदे वासुली-औद्योगिक वसाहतीने विकासकाकडून समृद्धीकडे वाटचाल करीत असलेल्या व अवघ्या 20 महिन्यांच्या कालावधीत नवनवीन विकास योजना राबवून गावाचा कायापालट करणाऱ्या सावरदरी ग्रामपंचायतीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.
सावरदरी (ता.खेड) येथे जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी 97 लाखांच्या पाणी योजनेचे भूमिपूजन,आंबेडकर नगर येथे बौद्ध विहार उद्घाटन, धर्मवीर संभाजी राजे उद्यान उद्घाटन, ग्रामपंचायत कार्यालय ते शिंदे वस्ती रस्ता उद्घाटन आणि उद्योजक सोमनाथ तरस यांच्या वैयक्तिक खर्चातून बांधण्यात येत असलेल्या जवळपास 25 लाख किमतीच्या सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले, त्याप्रसंगी आमदरा मोहिते बोलत होते.
याप्रसंगी चंद्रकांत इंगवले, कैलास लिंभोरे, जयसिंग दरेकर, गणेश बोत्रे, आशिष येळवंडे, अमोल पानमंद, सरपंच भरत तरस, दत्तात्रेय पडवळ, रवींद्र चव्हाण, उद्योजक सोमनाथ तरस, मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, पोलीस पाटील राहुल साकोरे, शरद वाडेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले की, सावरदरीने मागील 20 महिन्यांच्या काळात नेत्रदीपक काम केले आहे.विरोधकांना दोष देऊ नका तर आपले काम करीत रहा. तुमच्या विकासकामांची दखल समाज नक्की घेईल. महाविकास आघाडी सरकार असताना जलजीवन योजना मंजूर केल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शिंदे यांनी प्रास्ताविक माजी उपसरपंच आणि सदस्य संदीप पवार यांनी तर मच्छिंद्र शेटे यांनी आभार मानले.
राष्ट्रवादी-भाजपात कलगीतुरा
सध्या तालुक्यात विशेषतः पाईट पिंपरी गटात विकास कामांबाबत श्रेयवादाची लढाई चालू आहे. राष्ट्रवादी कडून रस्ते, पाणी योजना किंवा जिल्हा नियोजन समितीमाध्यमातून मंजूर कामे ही तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळातील आहे. तर भाजपा कडून हि सर्व कामे युती सरकारची असून भाजप व शिंदे गटाच्या मागणीवरुन पालकमंत्र्यांनी मंजूर केली.
आहे. सध्या कोण मंजूरी पत्र देताहेत तर भूमिपूजन दुसरे कोणीच करत आहे. कुठे कुठे तर एकाच कामाचे दोन वेळा भूमीपुजन केले जात आहे. सोशल मीडीयावर राष्ट्रवादी व भाजपाचा कलगीतुरा रंगलेला दिसतोय. परंतु सध्या नागरिक मात्र संभ्रमावस्थेत आहे.