पुणे – महापालिकेचा कारभार स्थानिक पातळीवर सांभाळणाऱ्या “मिनी महापालिका’ म्हणून क्षेत्रीय कार्यालये ओळखली जातात. मात्र, पंधरापैकी तब्बल 12 कार्यालयांना पूर्ण वेळ सहायक आयुक्त नसल्याचे समोर आले आहे. वर्ग-1 चे अधिकारी या पदावर नेमणे आवश्यक आहेत. पण, शासनाकडून प्रतिनियुक्तीने आलेले सहा जण हे वर्ग-2 चे अधिकारी तसेच 7 क्षेत्रीय कार्यालयांत उप अभियंत्यांकडे हा पदभार आहे.
केवळ दोन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपायुक्तपदाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यातील एक जण पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. महापालिकेच्या निवडणुका न झाल्याने नगरसेवक नाहीत आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्रीय कार्यालयात अधिकारीही नाहीत. त्यामुळे दाद कुणाकडे मागणार, असा प्रश्न पुणेकरांना सतावत आहे.
आयुक्तांच्या अधिकारांचे हस्तांतरण करत नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय प्रमुखांना अधिकार दिलेले आहेत. त्यात परिमंडळ उपायुक्तांना 25 लाख रुपयांपर्यंत तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कामाचे अधिकार असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर रस्ते दुरुस्ती, चेंबर दुरुस्ती, पथदिवे, स्वच्छता, प्रभागनिहाय दैनंदिन देखभाल दुरुस्ती कामांसह नागरिकांना आवश्यक सेवा याबाबत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर निर्णय घेतात.
दरम्यान, महापालिकेतील हे वर्ग-1 चे पद असून या पदावर उपायुक्त दर्जाच्या अधिकारी नेमला जातो. मात्र, 15 मधील 12 क्षेत्रीय कार्यालयात सक्षम अधिकारी नसल्याने क्षेत्रीय कार्यालयांचे काम वेळेत होत नसल्याचे चित्र आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियुक्त अधिकारी
- औंध – मुख्याधिकारी (शासन नियुक्त)
- कोथरूड – उपअभियंता (अतिरिक्त पदभार)
- वारजे-कर्वेनगर – उपअभियंता (अतिरिक्त पदभार)
- घोलेरस्ता- शिवाजीनगर – उपअभियंता (अतिरिक्त पदभार)
- ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय- उपअभियंता (अतिरिक्त पदभार)
- भवानी पेठ – बीडीओ (शासन नियुक्त)
- कळस- येरवडा – मुख्याधिकारी (शासन नियुक्त)
- नगररस्ता- वडगाव शेरी – उपायुक्त (महापालिका)
- हडपसर- मुंढवा – बीडीओ (शासन नियुक्त)
- वानवडी- येवलेवाडी – उपायुक्त (महापालिका)
- येवलेवाडी – मुख्याधिकारी ( शासन नियुक्त)
- सिंहगड रस्ता -उपायुक्त (महापालिका )
- बिबवेवाडी – उप अभियंता (अतिरिक्त पदभार)
- सहकारनगर – मुख्याधिकारी (शासन नियुक्त)
- कसबा – विश्रामबागवाडा – मुख्याधिकारी (शासन नियुक्त)