पुणे- “गणपती बाप्पा मोरया’, “मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात प्रमुख सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना शुक्रवारी सकाळी मंगलमय वातावरणात झाली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निमंत्रित उपस्थित होते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली असून, भाविकांना घरूनच दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात “श्रीं’ची प्रतिष्ठापना झाली. मंदिर बंद असल्याने निवडक विश्वस्तांच्या उपस्थितीत आणि ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते 10 वाजून 23 मिनिटांनी प्रतिष्ठापना झाली. वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांनी पौरोहित्य केले.
उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. “ऑगमेंटेंड रिऍलिटी’ या तंत्रज्ञानाचा वापर हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी ऑनलाइन दर्शन घ्यावे, याकरीता या तंत्राचा वापर करण्यात येत आहे. आपण गाभाऱ्यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
अखिल मंडई मंडळ
अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन मंदिरात दुपारी 12 वाजता विराजमान झाले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. “सूर्य’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक फुलांची आरास मंदिरात केली आहे. अविनाश कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.
यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, उपाध्यक्ष मिलिंद काची आदी उपस्थित होते. सकाळी 6 वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग, सायंपूजा आणि संध्याकाळी 7.30 वाजता महाआरती होणार आहे. यासह मंडळाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक 2 तासांनी फॉग मशीनच्या सहाय्याने पूर्ण मंदिर सॅनिटाइज केले जाणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.