सातारा -सदरबझार परिसरातील जयजवान हौसिंग सोसायटीतील रस्त्यावर एक गवा पिल्लासह गुरुवारी रात्री आल्याने खळबळ उडाली होती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल चार तास परिश्रम घेऊन गव्याला खेड, सैदापूरमार्गे महादरे येथे जंगल क्षेत्रात पिटाळले.
गवा मानवी वस्तीत कसा आला, याची चर्चा परिसरात दिवसभर सुरू होती. सदरबझार येथील जयजवान हौसिंग सोसायटीत गुरुवारी (दि. 9) रात्री साडेदहाच्या सुमारास गवा व त्याचे पिल्लू नागरिकांना दिसले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती.
काही दुचाकीस्वारांना रस्त्यावर गवा दिसताच, त्यांची बोबडी वळली. वन विभागास याची माहिती मिळाल्यावर वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण आणि दहा कर्मचाऱ्यांनी पहाटे दोन वाजेपर्यंत अथक परिश्रम घेऊन नगवा जंगला सुरक्षितरित्या पोहोचेल, याची व्यवस्था केली.
उपवनसरंक्षक महादेव मोहिते, वनाधिकारी महेश झांजुर्णे, वनपाल कुशल पावरा, प्रशांत पडवळ, वनरक्षक सुहास भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटेपर्यंत प्रयत्न करून त्यांनी गवा व त्याच्या पिल्लास कूपर कॉलनीतून सैदापूरमार्गे महादरेच्या डोंगराकडे वळवले.