पुणे – वनविभागातर्फे करण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाई अंतर्गत शुक्रवारी (दि. 29) महंमदवाडी परिसरातील तब्बल 20 गुंठे जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले आहे. या जमिनीची किंमत सुमारे 10 कोटी असल्याचे सांगितले जात असून, याप्रकरणी अतिक्रमण धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, महंमदवाडी येथील सर्वे नंबर 41 चे क्षेत्र 1 मार्च 1879 अन्वये राखीव वन म्हणून घोषीत झाले होते. हे क्षेत्र महसुल विभागाच्या ताब्यात होते. त्यानंतर 2009 साली वनविभागाने ही जागा ताब्यात घेतली. नुकतेच त्याठिकाणी क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले असल्याने,विभागाकडून संबधित अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. त्याचबरोबर स. नं. 45 येथील 3 गुंठे अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
संबधित अतिक्रमणधारकांवरती भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही चालू आहे. ही कारवाई पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, प्रदीप संकपाळ, वनपाल समिर इंगळे, वनरक्षक मनोज पारखे यांनी केली.