ऑकलंड – जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकच्या नावात बदल करण्यात आला आहे. आता फेसबुकचे नाव “मेटा’ असे असेल. हा बदल रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने करण्यात आला आहे, अशी माहिती फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने दिली.
कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये मार्क झुकरबर्ग यांनी नवीन नावाची आणि लोगोतही बदल करणार असल्याची घोषणा केली. झुकरबर्ग म्हणाले, आता कंपनी जी कामे करत आहे ती सर्व फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचे म्हणजेच पॅरेंट कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय आहे.
आता आपण मेटाव्हर्स पद्धतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे त्यांनी सांगितले.
मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिऍलिटी आणि ऑगमेन्टेट रिऍलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभ केलेले आभासी जग.
याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असे म्हटले जाते. स्क्रीनवर टाइप करण्यापासून सुरुवात करत आज आपण मोबाईपर्यंत येऊन पोहचलो आहे. सध्या आम्ही जे काम करतोय त्यासाठी फेसबुक हे नाव पुरेसं आणि सर्वसामावेशक वाटत नाही. म्हणूनच यापुढे आम्ही मेटा या नावाने ओळखले जाणार आहोत, असे मार्क झुकरबर्ग म्हणाले.
सध्या फेसबुक या ब्रॅण्डखाली या कंपनीच्या उपकंपन्या आहेत. यामध्ये खास करुन फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलस आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे. हे नामकरण करताना सध्या असणाऱ्या सेवा आणि ऍपची नावं बदलली जाणार नाहीत, असेही झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले आहे.
अगदी साध्या शब्दात सांगायचं झाल्यास फेसबुकने केलेला बदल हा पूर्णपणे व्यवसायिक असून वापरकर्त्यांवर म्हणजेच त्यांची सेवा वापरणाऱ्यांवर सध्या तरी काही मोठा परिणाम होणार नाही. यापुढे आम्ही सर्व कारभार हा फेसबुक फर्स्ट धोरणाऐवजी मेटाव्हर्स फर्स्ट या भूमिकेमधून करणार आहोत. यासंदर्भात मार्क झुकरबर्गने फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे.
केवळ नावच नाही तर कंपनीने आपला लोगोही बदलला आहे. आता फेसबुकच्या एफऐवजी इन्फीन्टीचे चिन्हं हे कंपनीचा लोगो असणार आहे. या चिन्हामधून आणि नवामधून फेसबुकने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमर्याद शक्यता आणि त्यावरील संशोधन आता याच ब्रॅण्डनेमखाली केलं जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.