रेल्वेचा दावा : पाण्याच्या पूनर्वापरासाठी एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट
पुणे – पुणे रेल्वे विभाग पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात प्रयत्न करत असून, त्याचा एक भाग म्हणून घोरपडी कोचिंग डेपो पुणे येथे स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट सुरू करण्यात आला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल, असा दावा रेल्वे विभागाने केला आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय यांत्रिक इंजिनियर विजयसिंह दडस यांच्या नेतृत्वाखाली घोरपडी कोचिंग डेपो येथे स्थापित स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांटमध्ये प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पाण्याला पुन्हा कोचेसच्या धुलाईयोग्य करण्यासाठी एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट बसवण्यात आला आहे.
त्यामुळे कोच धुण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा वापर प्रति कोच 1500 लिटर वरून कमी होऊन 230 लिटर झाला आहे आणि वॉशिंग लाइन (पिट लाइन) मध्ये रेक प्लेसिंग करताना 24 डब्यांच्या गाडीची सफाई जवळपास 07 मिनिटांत पूर्ण होते ज्यामुळे वेळेची आणि मनुष्यबळाची ही बचत होत आहे.
मातीचे प्रदूषणही थांबणार
प्लांटचे वैशिष्ट्य म्हणजे गाडीचा रेक धुलाई क्षेत्रातून 5 ते 8 किमी/तास वेगाने चालवून स्वच्छ केला जातो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षिततादेखील सुनिश्चित होते. हेच काम मनुष्यबळाने केले असते तर ते पूर्ण होण्यास 4 तास लागले असते आणि पाण्याचा अपव्यय अधिक झाला असता.
स्वयंचलित कोच वोशिंग प्लांटमुळे पाण्याचा वापर खूप कमी होत आहे आणि कोचच्या धुलाईनंतरचे दूषित पाणी रिसायकल करून परत उपयोगात आणले जाते. त्यामुळे सुमारे 80 टक्के ताज्या पाण्याची बचत शक्य झाली आहे. प्लांटच्या क्षेत्रात दूषित पाण्यामुळे पूर्वी होणारे मातीचे प्रदूषणही आता थांबले आहे. अशाप्रकारे हा स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट स्थापित केल्यामुळे वेळ, श्रम, ऊर्जा, पाण्याची बचत होण्याबरोबरच प्रदूषणही कमी झाले आहे.