कारवाईत जवळपास 1600 चौरस फूट अतिक्रमण काढले
पाषाणकडे जाणारी वाहतूक कोंडी फुटणार
पुणे – शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात बहुमजली उड्डाणपूल तसेच भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. या पुलाचे काम सुरू होणार असल्याने महापालिकेकडून या चौकातील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत, गुरुवारी अतिक्रमण विभागाकडून पाषाण रस्त्याच्या बाजूला असलेली अतिक्रमणे काढत रस्ता रूंद करण्यात आला. त्यामुळे गणपती मंदिर रस्त्याकडून आलेल्या वाहनांना आता मुख्य चौकात न येता बाजूनेच पाषणच्या दिशेला जाण्यासाठी मोठा रस्ता उपलब्ध होणार आहे. दरम्यान, या कारवाईत जवळपास 1600 चौरस फुट अतिक्रमण काढण्यात आले. त्यात टपऱ्या, हॉटेल तसेच काही दुकानांचा समावेश होता.
या चौकातील उड्डाणपुलासाठी जवळपास वर्षभरापूर्वी जुना उड्डाणपूल पाडण्यात आलेला आहे. त्यानंतर अद्यापही या चौकातील काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. महापालिकेच्या सेवा वाहिन्या, रखडलेले रुंदीकरण, अशा अनेक कारणांमुळे अद्यापही हे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती.
या बैठकीत या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासह तातडीने उर्वरित कामे पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी महापालिकेकडून या चौकात अतिक्रमण कारवाई करत रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मोठा रस्ता उपलब्ध होणार असून उड्डाणपुलाचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.