Sharad Pawar on Eknath Shinde| राज्यातील अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. काही राजकीय नेते राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत आहेत. यातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव करत राज्य सरकारला योग्य त्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
“राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत योग्य कार्यवाही करावी, ही अपेक्षा आहे,” असे शरद पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर म्हंटले आहे. सोबतच त्यांनी पत्राचे फोटो शेअर केले आहेत.
शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत असे मी आवाहन करतो. मात्र त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिल्यास मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा थेट इशारा पत्राद्वारे दिला आहे.
शरद पवार यांनी पत्रात काय म्हंटले?
मी मागील महिन्यात २४ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. सदर पत्रकार परिषदेत मी राज्य सरकारशी सहकार्य करण्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची भूमिका घेतली होती. आपण देखील आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र या महत्त्वपूर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधी व मंत्री गैरहजर होते. आपण सदर बाबीची योग्य ती दखल घेतली असेलच. मात्र राज्य सरकार अध्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही, हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. मागील १० दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली… pic.twitter.com/DqKOikW2qk
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 3, 2024
पाणीटंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक
राज्यातील उजनी, जायकवडी सारखी महत्त्वाची धरणे आटली आहेत. संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाला देखील बसली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक जळगाव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवड्यासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी या तालुक्यांतील पाणीटंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.
राज्यशासनाने फळबागा वाचविण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही
मागील वर्षी राज्यात केवळ ११०० टँकर्स होते. आजमितीस ती संख्या ११ हजारांच्या वर गेली असून टँकर्ससाठी पाणी भरण्याचे स्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून राज्यशासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. दुष्काळ निवारणाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत, हे दुर्देवाने नमूद करावेसे वाटते.
आश्वासक बदल न दिल्यास संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल
दुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भूमिका घेत आलो आहे. परंतु या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणे कठीण झाले आहे. दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत असे मी आवाहन करतो. मात्र त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिल्यास मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे नमूद करतो, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
हेही वाचा:
‘आम्ही कधीच गायब नव्हतो’ ; ‘Laapata Gentlemen’ च्या टीकेला मुख्य निवडणूक आयुक्तांकडून प्रत्युत्तर