पुणे – वीजपुरवठा बंद झाला आणि पुणे मेट्रोची वनाज ते रुबी हॉल मार्गावरील सेवा शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता ठप्प झाली. ऐन कामाच्या वेळेतच मेट्रो बंद पडल्यामुळे प्रवाशांना ऑफिस, शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी उशीर झाला.
वनाज ते रुबी हॉल मार्गावरील मेट्रो सेवा सकाळी 10.31 ते 10 वाजून 52 मिनिटांपासून अचानक बंद होती. यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी मेट्रो बंद असल्याचे चित्र दिसून आले. एक गाडी तर संगम पुलाजवळ ट्रॅकवर उभी होती. नेमके काय झाले, हे प्रवाशांना समजत नव्हते. सुमारे 25 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मेट्रो जागेवर उभी होती. कशामुळे बंद झाली हे देखील प्रवाशांना सांगितले जात नव्हते. यापूर्वीदेखील दोन ते तीन वेळा वीजपुरवठा बंद झाल्यामुळे किंवा तांत्रिक कारणामुळे मेट्रो सेवा काही वेळ ठप्प झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
स्क्रीनही ऑफ
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतरही मेट्रोची यंत्रणा काहीशी कोलमडलेलीच होती. स्क्रीनवर शेड्युल टायमिंग बिघडल्यामुळे काहीठिकाणी स्क्रीन बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांनाही मेट्रो कधी येणार, याबाबत माहिती मिळत नव्हती. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. यामध्ये मेट्रो प्रशासनाचीही चांगलीच दमछाक झाली.