सातारा – सातारा शहरातील मिळकतींसंदर्भात चुकीची घरपट्टी आकारणी झाली आहे. समान मिळकतींना वेगवेगळी घरपट्टी, भाडेकरूंच्या नोंदणी मिळकत पत्रावर नसताना भाडेकरी गृहीत धरून घरपट्टी आकारणे अशा अनेक त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. यासंदर्भात सातारकरांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. या घरपट्टी आकारणीतील त्रुटी तत्काळ दूर कराव्यात व नागरिकांच्या सोयीसाठी हद्दवाढीच्या भागात तातडीने कॅम्प घेऊन तिथल्या तिथे त्रुटी दुरुस्त करून घरपट्टी जमा करावी, अशा स्पष्ट सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांना दिल्या.
आमदारांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांनी पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात अक्षरशः तक्रारींचा पाऊस पाडला. गेल्या पंधरा दिवसांपासून सातारा पालिकेने चतुर्थ वार्षिक पाहणीच्या अपील प्रक्रियेला स्थगिती दिलेली असताना जुनी घरपट्टी गृहीत धरून हद्दवाढीच्या भागांना 40 टक्केप्रमाणे घरपट्टीची बिले काढली आहेत.
या रकमा काही हजारोंच्या घरात असल्याने सर्वसामान्य सातारकर सुविधा नसल्यामुळे मेटाकुटीला आले आहेत. या रकमा कशा भरावयाच्या याविषयी गोंधळाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी मुख्याधिकारी बापट यांची पालिकेत भेट घेतली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, शेखर मोरे, अविनाश कदम, रवी पवार, पक्षप्रतोद अमोल मोहिते, अशोक मोने इत्यादी यावेळी उपस्थित होते. जुन्या घरपट्टीप्रमाणे चतुर्थ वार्षिक पाहणीला आधीन राहून ही बिले काढण्यात आली असून हद्दवाढीच्या भागातील नागरिकांनी देय रक्कमच अदा करावयाची आहे, असे मुख्याधिकारी बापट यांनी सांगितले. यासंदर्भात काही त्रुटी असतील तर नागरिकांनी तात्काळ संपर्क साधून त्रुटी दुरुस्त करून घ्याव्यात, असे त्यांनी सांगितले.
घरपट्टी आकारणाविषयी लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कर आकारणी करताना सदनिकांमधील जिने, बाथरूम यांचा अंतर्भाव केला आहे. मोकळ्या जागांचाही समावेश घरपट्टीत झाल्यामुळे त्यांच्या रकमा वाढल्या आहेत, समान मिळकती, समान बांधकामे असताना वेगवेगळ्या घरपट्टी आकारल्या गेल्या आहेत. हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांमध्ये घरपट्टीविषयी अजिबात प्रबोधन नाही.
मुख्याधिकाऱ्यांनी अधिकारी व दोन कर्मचारी तसेच घरपट्टी वसुलीची ऑनलाइन यंत्रणा घेऊन हद्दवाढीच्या भागात कॅम्प लावावेत व तेथेच घरपट्टी दुरुस्त करून ती वसूल करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली. यासंदर्भात मुख्याधिकारी बापट म्हणाले, “”घरपट्टी ऑनलाइन भरण्यासाठी क्यूआर कोड विकसित करण्यात आला आहे. त्याचा उल्लेख घरपट्टीच्या बिलावर आहे. नागरिक ऑनलाइन घरपट्टी दुरुस्त करू शकतात. मात्र, यासंदर्भात नागरिकांना योग्य त्या सूचना देण्यात येत आहेत. पुढील काही महिन्यात ही ऑनलाइन प्रणाली अद्ययावत करण्यात येईल. मात्र, आपल्या सूचनेप्रमाणे हद्दवाढीच्या भागात शाहूनगर, पिरवाडी, विलासपूर, शाहूपुरी येथे यासंदर्भात कॅम्प लावले जातील आणि घरपट्टीच्या बिलांमध्ये असणाऱ्या त्रुटी दुरुस्त केल्या जातील.” असे सांगितले.