पुणे :– वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणुक मतदानाच्या आदल्या दिवशी लांबली आहे. उद्या (दि.३१ जानेवारी) होणारी निवडणूक आता १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मतदार यादीत बोगस म्हणजेच जिल्ह्याच्या बाहेरील नावे असल्याचा आरोप अनेक वकिलांनी घेतला.
– आता १६ फेब्रुवारीला होणार मतदान व मतमोजणी
– मतदार यादीत जिल्ह्या बाहेरची मते असल्याचा आरोप
या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील वकिलांची स्कुटीनी करण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक होणार आहे. मात्र, पुणे बार असोसिएशन आणि निवडणूक अधिकार्यांच्या बोंगळ कारभारावर अनेक वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक लांबविल्याची ही घटना बारच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे.
निवडणूकीसाठी सुमारे ७ हजार ८०० वकील मतदान करणर होते. मात्र, यामध्ये बोगस अथवा पुण्याच्या बाहेरील वकिलांची नावे असल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून होत होता. १ हजार ८३७ मतांवर आक्षेप घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूकीच्या आदल्या दिवशी अनेक वकिलांनी आक्षेत घेतला. त्यामुळे निवडणूक लांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
“मतदार यादीतील अनेक वकील हे जिल्ह्याबाहेरचे असल्याचा आक्षेप आहे. मात्र, अनेक वकील बाहेरगावचे आहेत. त्यांचे पत्तेही पुण्याच्या बाहेरचे आहेत. मात्र, ते पुण्यात प्रॅक्टीस करतात. या पार्श्वभूमीवर मतदारांची स्कुटीनी करण्यात येणार आहे. ज्यांचे पुण्याच्या बाहेरील पत्ते आहेत. त्यांना स्थानिक पुरावा मागण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
– ॲड. केतन कोठावळे, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
नवीन धोरणानुसार ३ फेब्रुवारी रोजी मतदान यादी जाहीर करणयत येणार आहे. यावर ८ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप घेता येणार आहेत. १२ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे. याबाबतची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. केतन कोठावळे व मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. दादाभाऊ शेटे यांनी दिली.