पुणे – कारचालकाशी झालेल्या वादातून पीएमपी चालकाने बेदरकारपणे वाहनांना धडक दिल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावर (Senapati bapat road) घडली. बसने धडक दिल्याने वाहनांचे नुकसान झाले. पीएमपी (PMP) प्रवासी भयभीत झाले. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी पीएमपी चालकास अटक केली.
नीलेश ज्ञानेश्वर सावंत (31 , रा. अतुलनगर, वारजे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सुशील लोखंडे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कार चालक अद्यापही तक्रार देण्यास पुढे आला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.(PMP driver nilesh sawant)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी चालक नीलेश सावंत शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावरून विद्यापीठ चौकाकडे निघाला होता. त्यावेळी जे. डब्ल्यू. मेरिएट हॉटेलसमोर पीएमपी चालक सावंत याचा एका कारचालकाशी वाद झाला. कारचालकाने पीएमपी चालक सावंतला थांबविण्याचा प्रयत्न केला. सावंतने बस पुढे नेली. कारचालक बसच्या मागे होता. (Pune police)
सावंतने काही कळायच्या आत बस मागे नेली. कारला बसने धडक दिली. अचानक बस भरधाव वेगाने मागे नेण्यात आल्याने पीएमपी प्रवाशांमध्ये घबराट उडाली. पीएमपी प्रवाशांनी आरडाओरडा केला. नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी बसचालक सावंतला बस थांबविण्यास सांगितले.
सावंत बस घेऊन पसार झाला. काही अंतरावर त्याला नागरिकांनी पकडले. पीएमपी चालक सावंतने दारू प्याल्याचे तपासणीत उघडकीस आले आहे. पीएमपी बस पुणे विद्यापीठमार्गे पिंपरी-चिंचवडकडे निघाली होती. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. या घटनेमुळे सेनापती बापट रस्त्यावर गोंधळ उडाला. या घटनेची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली. स्वारगेट आगारातून निघालेल्या एसटी चालक संतोष माने याने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिल्याची घटना काही वर्षांपूर्वी स्वारगेट परिसरात घडली होती.