पुणे – ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झालेला अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील रुग्णालयातून अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय सांभाळत होता. तो नाशिकमधील मेफेड्रोन तयार करणाऱ्या कारखान्यातील कामगारांच्या संपर्कात होता. ललितला मदत करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी न्यायालयात दिली. ललित पाटीलसह साथीदारांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ससून रुग्णालयातून पसार झालेला अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि साथीदारांना पुणे पोलिसांनी मंगळवारी (दि.31) मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात ललितसह साथीदारांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. ललितसह साथीदार शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित यांचा मुंबई पोलिसांकडून ताबा मिळविण्यासाठी पुणे पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला होता.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी ललितसह साथीदार शिंदे आणि पंडित यांना अटक केली. तिघांना बुधवारी (1 नोव्हेंबर) शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. अंमली पदार्थ विक्री प्रकरणात ललितसह 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे. ललितचे साथीदार समाधान बाबाजी कांबळे (रा. नाशिक), इम्रान शेख उर्फ आमिर खान (रा. धारावी, मुंबई), हरिष पंत (रा. मुंबई) यांना अटक करायची आहे. ललितला मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर येरवडा कारागृहात ठेवण्यात आले.
कारागृहातून तो उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झाला होता. ससूनमध्ये उपचार घेत असताना तो नाशिकमधील मेफेड्रोन निर्मिती कारखान्यातील कामगारांच्या संपर्कात होता. ललितला ससूनमध्ये कोणी मदत केली ?, तो कशा प्रकारे अन्य आरोपींच्या संपर्कात होता, याबाबतचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे.
नाशिकमधील शिंदे गावात श्री गणेशाय इंडस्ट्रीज नावाने सुरू करण्यात आलेल्या कारखान्यात ललित आणि साथीदार मेफेड्रोन तयार करत होते. निर्मिती, तसेच वितरणाची जबाबदारी आरोपींवर होती. ललित कारागृहात असताना नाशिकमधील कारखान्यात मेफेड्रोन निर्मितीचे काम ललितचा भाऊ भूषण, साथीदार अभिषेक बलकवडे, राहुल पंडित उर्फ रोहितकुमार चौधरी, शिवाजी शिंदे, जिशान शेख, रेहान उर्फ गोलू आलम सुलतान अन्सारी यांच्याकडे सोपविले होते.
त्याअनुषंगाने सखोल तपास करायचा आहे. शिंदे मेफेड्रोन निर्मितीसाठी कच्चा माल पुरवत होता. पंडित मेफेड्रोन तयार करत होता. आरोपी गोलू ऊर्फ रेहान अन्सारी मेफेड्रोनची विक्री करत होता. या गुन्ह्यातील आरोपींची एकत्रित चौकशी करायची असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती ऍड. मंजुश्री इधाटे-यादव यांनी न्यायालयाकडे केली. दरम्यान ललित याच्या जीवाला धोका आहे. संरक्षण देण्याची मागणी ऍड. संदीप पाली यांनी केली.