शिरूरचा आखाडा चांगलाच तापला : आजी- माजी खासदारांची लढत लक्षवेधी
मयूर भुजबळ
तळेगाव ढमढेरे – शिरूरचे मैदान चांगलेच तापले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून दोन दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत. मतदार गाठीभेटींना जोर आला असून उमेदवारांचे गावभेट दौरे सुरु झाले आहेत. आजी- माजी खासदारांची ही लढत राज्यात लक्षवेधी ठरली आहे. यात कसलेला मल्ल कसे डावपेच टाकतात, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. नक्की कोणाचे पारड जड होणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महायुतीचे उमेदवार, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मोठा जनसंपर्क असल्याने शिरूरचे दोनवेळा खासदार झाले आहेत. डॉ. अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार असून पाच वर्षांतील विकासकामाची मांडणी व मतदारसंघातील न्याय हक्कासाठी आवाज उठविल्याबद्दल त्यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे.
गतवेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. आढळराव यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मागील दोन वर्षात अनेक राजकीय बदल झाले. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेना युतीतून बाहेर पडून महाविकास आघाडी अस्तित्वात आली. शिवसेना पक्षात फूट पडून शिंदे गट बाहेर पडला. राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार गट बाहेर पडला. यावेळी लोकसभेची राजकीय गणिते बदलली आहेत.
मागील निवडणुकीत कोल्हे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे अजित पवार आत्ता आढळरावांचा प्रचार करणार आहेत. आढळराव यांना शिवसेनेकडून निवडून आणणारे उद्धव ठाकरे हे आत्ता अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. महायुतीकडे या मतदार संघात ६ पैकी ५ आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे १ आमदार आहे. परंतु कोल्हे यांच्या वकृत्वावर या भागातील मतदार प्रभावित असल्याचे दिसून येत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आयात उमदेवार दिल्याने पक्षीय कार्यकारिणी किती बळ देणार हे पाहणे गरजचे आहे. मैदानात पवारांची जादूची कांडी किती चालते यावर या लोकसभेचे भवितव्य अवलंबून आहे. शिरूर लोकसभेत शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शिरूरच्या मैदानात कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.
अटीतटीच्या लढतीकडे लक्ष
बारामती मतदारसंघानंतर पवार कुटुंबीयांसाठी दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे या लढतीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. मतदारसंघाचा बराचसा भाग ग्रामीण असला; तरी खेड, चाकण, भोसरी, रांजणगाव यांसारख्या औद्योगिक क्षेत्रामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे कसा राहील, यासाठी दोन गटांचा प्रयत्न आहे.
छुप्या आणि अंतर्गत खेळी होणार
जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे अतुल बेनके हे आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांशी ते जवळीक साधून आहेत. आंबेगावमध्ये सलग सात टर्म आमदार असलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत महायुतीत सामील झाले आहेत. खेडमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येणारे दिलीप मोहिते पाटील यांना अजित पवार यांचे समर्थक मानले जाते. शिरूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांचे कोल्हे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. भोसरीमधून महेश लांडगे हे या मतदारसंघातील भाजपचे एकमेव आमदार आहेत. चेतन तुपे पाटील हे हडपसरमधून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. कोल्हेंशी त्यांचे चांगले सख्य आहे. हे सारे आमदार आता कोणाच्या मागे किती ताकद लावणार आहेत. यावर चर्चा झडत आहे. शिरूर मतदारसंघात काही छुप्या आणि अंतर्गत खेळी खेळल्या जातील का, यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत.