मंचर -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी येथे चोरट्यांनी 2 हजार 100 रुपयांचे साहित्य चोरून नेले, तसेच एकाला लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. याबरोबरच खडकवाडी येथे देखील चोरी करण्याचा प्रयत्न करून घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. घटनास्थळी मंचर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी (दि. 17) पहाटे धामणी (ता. आंबेगाव) जाधवमळा येथे एकनाथ शंकर जाधव यांच्या घरात पहाटेच्या सुमारास चार चोरट्यांनी 2 हजार 100 रुपयांचे घरगुती साहित्य चोरून नेले. यावेळी त्यांचा मुलगा दीपक जाधव यांनी चोरट्यांना प्रतिकार केल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले.
या झटापटीत चोरट्यांचे घड्याळ घटनास्थळी पडले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते यांनी भेट दिली असून, पोलीस जवान विलास साबळे यांनी पंचनामा केला आहे. याबरोबरच खडकवाडी येथील बाळासाहेब केरू सुक्रे आणि आबा केरू सुक्रे यांच्या घरातील कपडे व इतर वस्तू चोरट्यांनी अस्ताव्यस्त करून फेकून दिल्या. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.