देशात नववा, राज्यात मिळवला पाचवा क्रमांक
शिरूर – स्वच्छ, सुंदर व हरीत शिरूरचा ध्यास मनी बाळगलेल्या स्वप्नपुर्तीस आज यश मिळाले असून शिरूर नगरपरिषदेने भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 मध्ये 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गटात देशात 9 वा क्रमांक व पश्चिम भारतातील सहा राज्यांत शेकडो नगरपरिषदांमधून पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यामुळे शिरूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची माहिती शिरूरच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी दिली.
यावेळी मुख्याधिकारी ऍड. प्रसाद बोरकर, नगरसेवक विजय दुगड, स्वच्छता सभापती विठ्ठल पवार, नगरसेविका मनीषा कालेवार, सुरेखा शितोळे, उज्वल वारे, संगीता मलाव, ज्योती लोखंडे, रेश्मा लोखंडे, सुनीता कुरुंदळे, नगरसेवक मंगेश खांडरे उपस्थित होते.
स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान 2021 अंतर्गत कचरामुक्त शहर व थ्री स्टार मानांकन मिळवल्याबद्दल (दि. 20) नोव्हेंबर 2021 रोजी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात दुर्गाशंकर मिश्रा, सचिव, गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालय यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करुन शिरूर नगरपरिषदेस गौरविण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे आणि मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
शिरूर नगरपरिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवत शिरूर शहरास हागणदारीमुक्ती बाबतचे (ओडीएफ++) मानांकन मिळाले आहे. यापूर्वीच्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान 2019 व 2020 अंतर्गत शिरूर शहरास देशात अनुक्रमे 70 वा आणि 32 वा क्रमांक मिळाला आहे.
शिरूर शहराच्या या यशामध्ये सभागृह नेते तथा उपनगराध्यक्ष प्रकाश धारिवाल, आमदार अशोक पवार, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, तत्कालीन मुख्याधिकारी महेश रोकडे, स्वच्छता सभापती विठ्ठल पवार, तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता टेकचंद नेमाडे, स्वच्छता निरिक्षक दत्तात्रय बर्गे, सर्व पदाधिकारी, नगरसेवक व सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे मोठे योगदान असल्याचे विजय दुगड यांनी सांगितले.