येत्या हंगामात 4 लाख 13 हजार हेक्टर ऊस उपलब्ध होणार
रमेश जाधव
रांजणी – पुणे विभागात आडसाली पूर्वहंगामी सुरू आणि खोडवा उसाचे सरासरी 3 लाख 43 हजार 392 हेक्टर क्षेत्र आहे. आत्तापर्यंत 4 लाख 13 हजार 150 हेक्टरवर ऊस लागवडी झाल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांनी 1 लाख 69 हजार हेक्टर खोडवा उसाचे
क्षेत्र राखले असल्याचे चित्र असून सरासरीच्या तुलनेत ऊस क्षेत्रात 69 हजार 758 हेक्टरने वाढ झाली आहे.
दरम्यान दरवर्षी बहुतांशी शेतकरी आडसाली उसाच्या लागवडी करतात. गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिल्याने लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे पुढील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे. दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामात उसा लागवड करतात.
जून ते जुलै महिन्यात आडसाली उसाच्या तर ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये पूर्व हंगामी आणि ऑक्टोबर नंतर सुरू उसाची शेतकरी प्रामुख्याने लागवडी करत असतात. आडसाली लागवड केल्यानंतर साधारणपणे 15 ते 17 महिन्यांनी तर पूर्व हंगामी 12 ते 14 महिन्यांनी ऊस साखर कारखान्यास तोडणीस येतात. गेल्या वर्षी 13 जानेवारी अखेरपर्यंत 1 लाख 86 हजार 540 हेक्टरवर लागवडी झाल्या होत्या. यंदा आडसाली उसाच्या 1 लाख 20 हजार 80हेक्टर पूर्व हंगामी , 78 हजार 573 हेक्टर सुरू 44 हजार 534 हेक्टर आणि खोडवा उसाच्या एक लाख 69 हजार 963 हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे.
जिल्ह्यातील ऊस लागवड
पुणे विभागातील पुणे, नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झाली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड, शिरूर, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, हवेली, बारामती या तालुक्यांत देखील मोठ्या प्रमाणात ऊस लागवडी झाल्या आहेत. मुळशी, मावळ, वेल्हे, खेड हे तालुके उसाच्या लागवडीपासून दूर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यात उसाच्या लागवडी झाल्या आहेत, तर बार्शी, सांगोला, उत्तर सोलापूर या तालुक्यांत कमी लागवडी झाल्या आहेत.
पुणे विभागात 1 लाख 17 हजार 71 हेक्टर ऊस लागवडीचे क्षेत्र असून यंदा सुमारे 1 लाख 4 हजार 479 हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे, यामुळे या विभागात उसाचा गळीत हंगाम होण्याची चिंता नाही. साखर कारखान्यांना मुबलक प्रमाणात गळीतासाठी ऊस उपलब्ध होईल.
– बाळासाहेब बेंडे पाटील, अध्यक्ष, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पारगाव