निगडाळेत बैलजोडीचा कुळव हाकत केली चिखलणी : “बांधावरची शाळा’ व “बळीराजासाठी एक दिवस’
मंचर – “बांधावरची शाळा’ व “बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमांतर्गत निगडाळे (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी शेतकरी बुधाजी लोहकरे, तसेच गेणू लोहकरे यांच्या शेतात जाऊन बैलजोडीचा कुळव हाकत शेतात चिखलणी करण्याचा आणि भात रोपे लावणीचा अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासून बळीराजाबद्दल आदर व प्रेम निर्माण व्हावे, आपला देश शेतीप्रधान असल्याने शेतीविषयी माहिती मिळावी, मुलांना शेतीचे महत्त्व समजावे, शेतीची कामं काय असतात, ती कशा प्रकारे केली जातात, या सर्व गोष्टींचे कार्यानुभवातून ज्ञान व्हावे यासाठी निगडाळे शाळेने “बांधावरची शाळा’, तसेच “एक दिवस बळीराजासोबत’ हे उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला आणि हीच संकल्पना लक्षात घेऊन शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी शेतीच्या कामाची, त्यासाठी लागणारे अवजारे यांची ओळख करून घेतली.
रोप (दाड) काढणे, मूठ बांधणे, चिखल करणे, लावणी करणे ही सर्व कामे विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने केली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक आपल्या मनात असणाऱ्या शंका विचारल्या. निगडाळेचे शेतकरी बुधाजी लोहकरे आणि गेणू लोहकरे यांच्या शेतात बांधावरची शाळा भरली होती. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैभव लोहकरे, मुख्याध्यापिका शोभा जाधव, उपशिक्षक संतोष थोरात, पालक अनंता भोमाळे यांचे सहकार्य लाभले.
रोप काढण्यासाठी मातीत घातलेले हात मातीशी असलेले नातेच जणू दृढ करत होते. या उपक्रमामुळे मुलांना प्रत्यक्ष अनुभवाचा व काम करण्याचा आनंद तर मिळालाच; पण शेतकऱ्यांबद्दल आदर व ऋण व्यक्त करण्याची एक संधीही मिळाली.
– संतोष रामचंद्र थोरात, (उपशिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, निगडाळे)
आम्ही मुलांनी आज भात लावणीचा आनंद घेतला.अन्नधान्य तयार करण्यासाठी शेतकरी किती मेहनत करतो हे पाहिले. आम्हाला लागेल तेवढेच अन्न घेणार, अन्न वाया घालवणार नाही.
– आर्यन शामराव तिटकारे, विद्यार्थी, 4 थी