आमदार पवार यांचे समर्थक, नेते निर्णयाच्या प्रतीक्षेत
मयूर भुजबळ
तळेगाव ढमढेरे – राज्यात सुरु असलेल्या राजकीय सत्तानाट्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते बुचकाळ्यात पडले आहेत.
शिरूर तालुक्यातील बाजार समिती, पंचायत समिती, बहुतांशी ग्रामपंचायत, सोसायटी, खरेदी विक्री, जिल्हा परिषद गट हे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांच्या ताब्यात आहेत. आगामी काळात आमदार पवार काय भूमिका घेतील, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
आगामी काळात बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होणार असल्याने आमदार पवार यांच्या घडामोडीवर पुढील रणनीती आखली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आमदारांनी साहेबांची बरोबर राहावं तर अजित पवार यांचे समर्थक आमदारांनी दादांच्या बरोबर राहावं, अशा भावना व्यक्त करीत आहेत.
दोन मतप्रवाह असले तरी आमदार पवार नक्की काय निर्णय घेतात, यावर शिरूरचे राजकारण अवलंबून आहे. त्यामुळे राजकारणाला कलाटणी मिळणार का याकडे लक्ष
लागून राहिले आहे.
राष्ट्रवादीची बांधणी भक्कमच…
तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटात आमदार राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी बाजी मारल्याने आमदारांनी स्वतः या गटाकडे विशेष लक्ष देत गटा- तटाचे वादविवाद मिटवले आहेत. या गटात राष्ट्रवादी पक्षाची बांधणी मजबूत केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी पुन्हा एखादा गट काबीज करून वर्चस्व निर्माण करण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यात राज्यातील राजकीय भूकंपात राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने आमदार अशोक पवार काय भूमिका घेतात. त्यानंतर या गटातील नेते, कार्यकर्ते कितपत आमदारांच्या पाठीशी उभे राहतात, याकडे तळेगाव ढमढेरे गटाचे भवितव्य अवलंबून आहे.