मंचर-लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेने दीपावलीनिमित्त सभासदांना 12 टक्के लाभांशाची रक्कम सभासदांच्या खात्यात वर्ग केली आहे. करोनाच्या काळात सरकारी कर्मचारी व करोना योद्धे यांना प्राधान्याने कर्जवाटप करण्यात आले, अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आढळराव पाटील संस्थापक अध्यक्ष असलेल्या लांडेवाडी येथील श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या 15 शाखा आहेत. मुख्य कार्यालय लांडेवाडी येथे असून पतसंस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आहे. करोना परिस्थितीत पतसंस्थेच्या वतीने विधायक उपक्रम राबवून गरीब कुटुंबांना किराणा वाटप तसेच गरजूंना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले होते.
पतसंस्थेने करोना काळातसुद्धा 300 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला आहे. 204 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 120 कोटींची गुंतवणूक केली आहे. 31 मार्च 2020 अखेर 1 कोटी 18 लाख रुपयांचा नफा झाला आहे. पतसंस्थेने सभासदांच्या हितांना नेहमीच प्राधान्य दिले आहे, असे संचालक सागर काजळे यांनी सांगितले.