नवी दिल्ली -दिवाळीत धनोत्रयोदशीला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा धनोत्रयोदशीला 30 टक्के जास्त सोन्याची विक्री झाली. ग्राहकांनी यंदाच्या धनोत्रयोदशीला 20 हजार कोटीपर्यंत सोन्यांची खरेदी केली अशी माहिती आयबीजेए या ज्वेलर्सच्या संघटनेने दिली. संघटनेने दिलेल्या माहीतीनुसार धनोत्रयोदशीला देशभरात 40 टन सोन्याची विक्री झाली. त्याची किंमत 20 हजार कोटी आहे.
आता लग्नाचा मोसम सुरु होईल. लोक इतके महिने थांबले होते. आता धनोत्रयोदशीच्या निमित्ताने लोकांनी सोन्या-चांदीची खरेदी केली. प्रति 10 ग्रॅम 56 हजारापर्यंत पोहोचलेल्या सोन्याची किंमत आता थोडी कमी झाली आहे. शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50 हजारच्या पुढे होती.
मागच्या वर्षी देशभरात 12 हजार कोटी रुपयाच्या सोन्याची विक्री झाली होती. यंदा हाच आकडा 20 हजार कोटींच्या घरात आहे अशी माहिती या संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र मेहता यांनी दिली. मागच्या वर्षी धनोत्रयोदशीला 30 टन सोन्याची विक्री झाली होती. यंदा 40 टन सोन्याची विक्री झाली असे मेहता म्हणाले.
मागच्या वर्षीच्या तुलनेत 30 ते 35 टक्के विक्री वाढली. सोन्याची किंमत 70 टक्क्याने वाढली असे त्यांनी सांगितले. मागच्या आठ महिन्यात लॉकडाऊनमुळे ग्राहकांना सोने खरेदी करता आली नव्हती, त्यामुळे यंदा खरेदीत वाढ झाली असे मेहता म्हणाले.