12 ऑक्टोबरची डेडलाइन : …अन्यथा शिवप्रेमी श्रमदानातून दुरुस्ती करणार
इंदापूर – छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची इंदापूर येथे गढी आहे. या गढीचे बुरुज ढासळले आहेत. शासनाने अनेक वेळा आश्वासने देऊन सुद्धा गढीचे बांधकाम झाले नाही. हे बांधकाम समस्त शिवप्रेमी यांनी श्रमदानातून करण्याचे ठरवले आहे. गढीचे श्रमदानातून बांधकाम करण्यास परवानगी मिळावी. अन्यथा उपोषण करणार आहोत, अशा इशारा इंदापूर तालुक्यातील शिवप्रेमी यांच्याकडून शासनाला देण्यात आला आहे.
याबाबत इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना शिवप्रेमी यांच्याकडून निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रा. कृष्णा ताटे, पवन घोगरे, कैलास कदम, सुनील गलांडे, महादेव सोमवंशी, रोहीत पाटील, संग्राम उंबरे, प्रवीण पवार, राम आसबे, धरमचंद लोढा,
हरिभाऊ जाधव, संकेत माने, निलेश कदम, हमीदभाई आतार, संजय बोरा, परमेश्वर काळे, संतोष सूर्यवंशी, संदेश कडवळे, अस्लम बागवान, सागर गानबोटे, काकासाहेब मांढरे आदी शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी दुरुस्त करून आमचा वैभवशाली इतिहास जपण्याचा प्रयत्न करावा. यासाठी आम्ही सर्व शिवप्रेमी यांनी मागील अनेक वर्षापासून मागणी केली होती. गढीवरती निधी टाकणार असल्याचे जाहीर केले; परंतु प्रत्यक्षात निधी टाकल्या गेल्याचे दिसत नाही व आराखडा केल्याचेही दिसत नाही.
17 ऑक्टोबरपासून उपोषण करणार
गेल्या अनेक वर्षात याविषयी धरणे आंदोलने झाल्याची चर्चा झाली. सुशोभिकरण करण्याचे नुसते आश्वासन देऊन शिवप्रेमींना फसवल्याचे लक्षात आले. म्हणून समस्त शिवप्रेमींच्या वतीने असा निर्णय घेण्यात आला आहे की, गुरुवार (दि. 12) पर्यंत शासनाने बुरुजांचे पुनर्बांधकाम केले नाही, तर समस्त शिवप्रेमी स्वतः हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी एकत्र येऊन श्रमदानाने पडलेल्या बुरुजाचे बांधकाम सुरू करतील. शिवप्रेमी 17 ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत.