वाहतूक कोंडीमुळे दमछाक : पोलिसांवर नियमनाचा ताण
जवळार्जुन – महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीनगरीत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. रविवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी प्रचंड झाल्याने तीन बाजूकडून येणाऱ्या रस्त्यावर तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांना वाहतूक नियमन करताना दमछाक करावी लागली आहे. दरम्यान, पुणे- पंढरपूर रस्त्याला बाह्यवळण आता बाह्यवळण झाल्यास वाहतुकीची कोंडी सुटण्यास हातभार लागणार आहे.
महाराष्ट्र व परराज्यातून येणाऱ्या भाविकांना तसेच जेजुरी परिसरातील नागरिकांना कोंडीचा त्रास होत आहे. सलग तीन दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे. त्यातच उन्हाळी सुट्टी सुरू आहे. दोन वर्षांत करोनामुळे बंद असलेले मंदिर खुले झाले आहे. सध्या लग्नसराईमुळे जेजुरीमध्ये कुलधर्म कुलाचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी होत आहे. त्याचा परिणाम वाहतुककीवर झाला आहे. जेजुरी शहरामध्ये जेजुरी सासवड रोड, जेजुरी- नीरा रोड आणि जेजुरी- मोरगाव रस्त्यावर तीन किलोमीटरपर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळ ते संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर असल्याने लोकांना पायी चालणे मुश्किल झाले होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी थांबवण्यासाठी जेजुरी पोलीस स्टेशनकडून प्रयत्न केले. मात्र, वाहतूक कोंडी सोडविताना पोलीसही हतबल झाले आहेत.
जेजुरी शहराबाहेरून बाह्यवळण तसेच शहरामध्ये उड्डाणपूल गरजेचे आहे. शहरातून पुणे पंढरपूर महामार्ग जात असल्याने महामार्गाचे वेळोवेळी रुंदीकरणासाठी सर्वेक्षण झाले. सर्वेक्षण होऊन राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. शहरातूनच हा रस्ता जात असल्यामुळे वाहतुकीची कोंडी आणखीन वाढत आहे. भाविकांना आणि शहरातील नागरिकांना त्रास होऊ शकतो. राष्ट्रीय महामार्गासाठी सासवड आणि नीरा शहराबाहेरील बाह्यवळण काढण्यात येणार आहे. मग जेजुरीच्या शहरामधूनच महामार्ग देण्याचा अट्टहास का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
जेजुरीत आलेले भाविक मल्हारसागर तीर्थावर देवकार्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहने घेऊन जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोरगाव रस्तामार्गे मल्हार सागर धरणावर भाविकांनी गर्दी केली होती. जेजुरी – सासवड, जेजुरी- नीरा, जेजुरी – मोरगाव रस्त्यावरील व्यावसायिकांना चलतीच्या काळात देखील व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे.
दरवर्षी 50 लाख भाविक दर्शनासाठी
जेजुरी शहरामध्ये वर्षाकाठी सरासरी 50 लाखांपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात. जेजुरीत दहा ते बारा यात्रा वर्षभरात असतात. दर रविवारी भाविक अर्धा लाखांच्या घरात आहेत. जेजुरीला यात्रेचे स्वरूप येत आहे. वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. जेजुरी शहरामध्ये पार्किंग सुविधा मोठ्या प्रमाणात देखील उपलब्ध नाही. शहरांमधून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये- जा सुरू आहे. पुणे- पंढरपूर मार्गावर सतत वाहनांची कोंडी असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडणे देखील जिकीरीचे झाले आहे.