मुळशीत राष्ट्रवादी, शिवसेनेसह कॉंग्रेसचा ग्रामपंचायतींवर दावा
पौड – मुळशी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील 23 ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत मतदारांनी तरूणाईच्या हाती गावच्या सत्तेच्या चाव्या दिल्या. काही ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागत नवोदितांना संधी मिळाली. तथापि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन्ही गट आणि कॉंग्रेसने ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचा दावा केला.
तालुक्यातील भांबर्डे, डावजे, जातेडे, वातुंडे या चार ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या होत्या. संभवे ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी अर्जच न आल्याने हे पद रिक्त राहीले. तर उर्वरीत अठरा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि काही सदस्यांच्या निवडीसाठी जनादेश घेण्यात आला. प्रचारासाठी कमी अवधी मिळाला असतानाही स्मार्ट पद्धतीने प्रचार यंत्रणा यावेळी पहायला मिळाली. तुल्यबळ लढतीमुळे विजयी कोण होणार, याची त्या गावातल्या ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनाही होती. पंचायत समितीच्या सभागृहात सहा फेऱ्यापर्यंत मतमोजणी करण्यात आली. दहा वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या दिड तासात सर्व निकाल हाती आले.
कोंढावळे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हा नियोजन समितीचे माजी संचालक अमित कंधारे यांच्या पत्नी पल्लवी कंधारे यांनी सुमारे चारशे मतांच्या फरकाने सुरेखा कंधारे आणि रंजना कंधारे यांचा पराभव केला. जामगावमध्ये विनोद सुर्वे यांनी बाजी मारली. त्यांनी किरण ठोंबरे, माजी सरपंच हनुमंत सुर्वे, शंकर बांदल यांना पराभूत केले. माले ग्रामपंचायतीत पत्नीनंतर पती तर आंबवणे ग्रामपंचायतीत पती पत्नीच्या हातात ग्रामस्थांनी सत्तेच्या चाव्या दिल्या. माले येथे सुहास शेंडे तर आंबवण्यात सिता कराळे विजयी झाले. यापूर्वी माले ग्रामपंचायतीत सुहास यांच्या पत्नी सोनल तर आंबवणेमध्ये सिता यांचे पती मच्छिंद्र कराळे हे गावकारभारी होते.
वळणे ग्रामपंचायतीत अपेक्षेप्रमाणे रोहीणी राजेंद्र सोंडकर यांनी अंजना जयवंत सातपुते यांच्यावर मात करीत विजयश्री खेचून आणली. वांद्रे ग्रामपंचायतीत माजी आमदार शरद ढमाले यांच्या पुतण्या अनिकेत यांना पराभवाचा धक्का बसला. वाघवाडीत प्रस्थापिताला धक्का देत प्रकाश वाघ हे विजयी झाले. मुळशी खुर्दमध्ये सुनिल पासलकर यांनी प्रज्वल कानगुडे आणि संतोष कानगुडे यांना पराभूत केले. तर वारकमध्ये संतोष भिलारे यांनी सुजाता मराठे यांना पराभूत केले.
शेडाणी ग्रामपंचायतीत वर्षा राऊत यांनी रूपाली ढोकळे आणि माया खिलारे यांच्यावर मात केली. बेलावड्यात सुजाता ढमाले यांनी छाया येनपुरे यांना पराभूत केले. खुबवलीत वैष्णवी पवार विजयी झाल्या. भादसमध्ये जयकिसन जाधव यांनी सख्ख्या भाऊबहीणींचा पराभव केला. धामणओहोळला वंदना शेडगे, मूगावला संगीता मरगळे, टेमघरला सचिन मरगळे तर वेगरे येथे राजश्री मरगळे, तर ताम्हीणी स्वाती चोरघे हे विजयी झाले. पौड ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीत किरण आगनेन यांनी संतोष पारखी यांचा तर कासारआंबोलीच्या निवडणूकीत ओंकार गायकवाड यांनी महेश मानकर यांचा पराभव केला.
मतमोजणी शांततेत
तहसीलदार रणजित भोसले, अप्पर तहसिलदार प्रियांका मिसाळ, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या देखरेखीखाली मतमोजणी शांततेत पार पडली.