पारगाव (ता. आंबेगाव) : येथे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करून रस्ता रोको करण्यात आला.
पारगाव शिंगवे – केंद्र व राज्य सरकारने सकल धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलने छेडण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत वाघमोडे यांनी दिला आहे. आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील चौकात अष्टविनायक महामार्ग रोखून धरून धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी रस्ता रोको करण्यात आला.
या आंदोलनात हजारो धनगर समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गेले कित्येक वर्षापासून राज्यातील धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे आरक्षणाची वेळोवेळी मागणी करण्यात आलेले आहे. यासाठी धनगर समाजाच्या वतीने अनेकदा आंदोलने मोर्चे उपोषण करून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देशात इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देण्यात आलेले आहे. फक्त महाराष्ट्रात धनगर आणि धनगड या शब्दप्रयोगामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे.
धनगर आणि धनगड ही एकच जात असून धनगड जमातीचे जात असल्याचे अद्याप पुरावा महाराष्ट्रात मिळालेला नाही. प्रत्येक वेळी राज्य सरकारने फक्त आश्वासने दिली असून धनगर आरक्षणासाठी कोणतीच अंमलबजावणी केली नाही, त्यामुळे समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचा राग व्यक्त करण्यासाठी पारगाव येथील चौकात अष्टविनायक मार्गावर तालुक्यातील धनगर समाजाचे कार्यकर्ते हजार एकत्र येऊन अष्टविनायक महामार्ग रोखून धरला होता.
धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी धनगर बांधव महिला युवक-युवती शालेय विद्यार्थी रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पारगावचे सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ग्रामविकास अधिकार्यांना दिले निवेदन
धनगर बांधवांनी आरक्षण मिळण्याबाबतची मागणी केली आरक्षणाचे मागणीचे निवेदन पारगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजणे यांना देण्यात आले.