चिंबळी -खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटल्याने भाव या आठवड्यात कडाडले आहेत. बटाटा व लसणाचे भाव स्थिर राहिले आहेत.
हिरवी मिरची व जळगाव भुईमुग शेंगाची आवक स्थिर राहूनही भावात घसरण झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व कोथिंबीरीची भरपूर आवक झाली. फळभाज्यांच्या बाजरात टोमॅटो, कोबी, वांगी व फ्लॉवरची किरकोळ आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्सी गाय, बैल, म्हैस व शेळ्या मेंढ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. चाकणला एकूण 4 कोटी 25 लाख रुपयांची उलाढाल झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 3,500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 750 क्विंटलने घटल्याने भावात 700 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 3,300 रुपयांवरून 4,000 रुपयांवर पोहोचला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 900 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 100 क्विंटलने वाढूनही कमाल भाव 1,400 रुपयांवर स्थिरावला.
भुईमूग शेंगाची आवक 20 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही भावात 1,500 रुपयांची घट झाली. या शेंगाचा कमाल भाव 8,500 रुपयांवरून 7 हजार रुपयांवर स्थिरावला. लसणाची आवक 15 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 3 क्विंटलने घटूनही कमाल भाव 10 हजार रुपयांवर स्थिरावला.
जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 105 जर्सी गायींपैकी 63 गायींची विक्री झाली. (10,000 ते 40,000 रुपये), 182पैकी 107 बैलांची विक्री झाली. (10,000 ते 30,000 रुपये), 185 म्हशींपैकी 148 म्हशींची विक्री झाली. (20,000 ते 60,000 रुपये), शेळ्या – मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 10,460 शेळ्या – मेंढ्यापैकी 9,545 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 2,000 ते 10,000 रुपये इतका भाव मिळाला.