तळेगावात शिबिरास प्रतिसाद
तळेगाव ढमढेरे – अखंड हरिनामाच्या गजरातून कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या सर्वांच्या मनात भक्तीची इंद्रायणी वाहती ठेवतात. आपण आपल्या प्रपंचात व्यस्त असतानाही कीर्तनकार, प्रवचनकार महाराजांच्या वाणीतून आपल्याला भक्तिरसाची गोडी चाखायला मिळते. आपल्या मनाला सदैव भक्तीने निर्मळ, निरोगी ठेवणाऱ्या महाराजांच्या आरोग्याची काळजी घेणे हे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
तळेगाव ढमढेरे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून जगदंब प्रतिष्ठान यांच्यावतीने प्रबोधनाची पालखी वाहणाऱ्या प्रवचनकार कीर्तनकारांसाठी कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात आरोग्य शिबिराप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी 100 हून अधिक वारकरी सांप्रदायातील प्रवचनकार, कीर्तनकार, गायक, वादक मंडळींनी लाभ घेतल्याचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे यांनी सांगितले. आमदार अशोक पवार म्हणाले की, जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून कीर्तनकार व प्रवचनकारांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. आरोग्य तपासणीमध्ये शरीर तापमान, रक्तामधील ऑक्सिजन, रक्तदाब, उंची, वजन, बॉडी मास इंडेक्स,
हृदयाची आरोग्य तपासणी, इसीजी चाचणी, कर्करोग तपासणी, डोळे, कान, घसा तपासणी, मोतीबिंदू आदी तपासण्या झाल्या. यावेळी ६ लाखांचे सुरक्षा कवचही मोफत दिले जाणार असल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुदीप गुंदेचा यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, घोडगंगाचे उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ, महिलाध्यक्षा विद्या भुजबळ, शिरूर तालुका प्रवक्ते बाळासाहेब ढमढेरे, शहाजी ढमढेरे, अमोल गायकवाड, गोविंद भुजबळ, उमेश भुजबळ, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.