प्रा. हंकारे : जातेगावात अतुल पवार यांचा स्मृतीदिनी विविध उपक्रम
पाबळ – भारतभूमीसाठी ज्यांनी रक्ताचा, विचारांचा अभिषेक केला. त्या महान राष्ट्रपुरुषांचा जयजयकार आपण सदैव केला पाहिजे. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, पी. टी. उषा, रणचंडिका ताराराणी, शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, भगतसिंग, राजगुरु, ताराराणी, कारगील योद्धा विक्रम बत्रा यांनी केलेला त्याग कदापि विसरू नका, असे प्रतिपादन प्रेरणादायी व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी केले.
जातेगाव येथे स्व. अतुल पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री संभाजीराजे विद्यालयात प्रा. हंकारे यांचे व्याख्यान अपूर्व विज्ञान मेळावा तसेच वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धां पार पडल्या. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पुणे जिल्हा कात्रज दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, पुणे विकास मंचाचे व बालाजी विश्वचे अध्यक्ष सदाशिव पवार, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, पंचायत समिती शिरुरचे माजी सभापती सुभाष उमाप, जातेगाव बुद्रुकचे सरपंच गणेश उमाप, माजी सरपंच किशोर खळदकर, उपसरपंच सुमनताई क्षीरसागर, संस्थेचे संचालक दत्तात्रय उमाप, साहेबराव उमाप, प्राचार्य रामदास थिटे, विनायक म्हसवडे, गणेश मिटापल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अपूर्व विज्ञान मेळाव्यात स्वयंचलीत पूल, अँटी स्लीप अलार्म, गॅस डिटेक्टर, सेफ्टी गेट, ग्रास कटर, वॉटर लिफ्टींग, ज्वारी काढणी यंत्र आदी ४५ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. प्रदर्शनासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.
प्राचार्य रामदास थिटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश बांगर यांनी केले. प्रा. महावीर भिसे यांनी आभार मानले.