fbpx

पुणे जिल्हा: नीरा गावाचा श्‍वास वाहतुकीने “कोंडला’

ऊस वाहतुकदारांचा आडमुठेपणा : वाहनांच्या रांगा

नीरा -पुरंदर तालुक्‍यातील ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या नीरा गावात दररोजच्या वाहतूककोंडीमुळे नागरिकांचा जीव कोंडला गेला आहे. मात्र, ही वाहतूक कोंडी होण्यामागे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टर चालकच जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई करून वाहतुकीला येणारे अडथळे दूर करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. 

पतळवाडी, वीर, जेऊर, मांडकी, पिंपरे, वाल्हे या गावातून मोठ्या प्रमाणात ऊस सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याकडे गाळपासाठी जातो. या दरम्यान नीरा शहरातून बाजारपेठेमधून ही वाहने जात असतात. नीरा येथे आल्यावर ही वाहने पुणे-पंढरपूर महामार्गावर किंवा भर पेठेत उभी करून ट्रक्‍टर चालक वाहतूककोंडी करतात. शुक्रवारी (दि. 19) असाच एक ट्रॅक्‍टर चालक पुणे-पंढरपूर महामार्गावर ट्रॅक्‍टर उभा करून कोंडीची गंमत पाहत असताना आढळून आला.

त्याच्याकडे लोकांनी विचारणा केली असता तो ट्रॅक्‍टरमधील डिझेल संपले असे सांगत होता. मात्र, पत्रकारांनी त्याचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने ट्रॅक्‍टर सुरू करून पुढे घेऊन जाण्यास सुरुवात केली. त्यावेळी पत्रकारांनी ट्रॅक्‍टर का उभा केला होता असे विचारले असता क्‍लिनर येत असल्याचे त्यांने सांगितले. मात्र, तोपर्यंत पुणे-पंढरपूर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

“सोमेश्‍वर’चा सुरक्षा सप्ताह कागदावरच?
सोमेश्‍वर कारखान्याच्या वतीने मागील आठवड्यातच ऊस सुरक्षा वाहतूक सप्ताह सुरू झाला. वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारखान्याने काढलेल्या वाहतूक परिपत्रकानुसारच वाहतुकदारांनी उसाची वाहतूक करावी, नियमांचे पालन करावे. अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचना वाहतूकदार गांभीर्याने घेत नसल्याने, कारखान्याचा सुरक्षा सप्ताह कागदावर आहे की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.