करोनाचा असाही आर्थिक फायदा; शिक्षण विभागाचे वाचणार कोट्यवधी रुपये

पिंपरी – गेल्या गेल्या सात महिन्यांपासून करोनामुळे सर्वांचे आर्थिक नुकसान झाले असले तरी महापालिकेच्या शिक्षण विभागाचे मात्र कोट्यवधी रुपये यंदा वाचणार आहे. शालेय साहित्यासह इतर विषयांसाठी करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या तरतुदी अद्यापही खर्चाविना तशाच आहेत. तसेच यातील अनेक बाबींवर यावर्षी खर्च करण्याचीच आवश्‍यकता नसल्यामुळे महापालिकेचा मात्र फायदा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविणाऱ्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचे शालेय साहित्य मोफत स्वरुपात उपलब्ध करून दिले जाते. यावर्षीच्या अर्थसंकल्पात शालेय शिक्षण विभागासाठी 161 कोटी 41 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील आठ कोटींची तरतूद वगळण्यात आल्याने सध्या शिक्षण विभागासाठी 153 कोटी 61 लाखांची तरतूद शिल्लक आहे. यातील बालवाडी शिक्षकांच्या मानधनासाठी 3 कोटींची तरतूद असून बालवाडीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य व गणवेश खरेदीसाठी 2 कोटी 55 लाख रुपयांची तरतू आहे. यापैकी मानधन वगळता इतर खर्च होण्याची शक्‍यता कमीच आहे.

त्याशिवाय पहिली ते दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासह गणवेश, स्वेटर, पीटी शूज, पावसाळी साधणे, वह्या, क्रीडा साहित्य, वॉटर बॉटल, टॅब, वॉटर फिल्टर, विद्यार्थी आरोग्य, गुणवत्ता व विकास, फर्निचर, बौद्धीक खेळणी, दप्तरे, पाट्या व इतर खरेदीसाठी तब्बल 45 कोटींहून अधिक रक्कमेची तरतूद करण्यात आलेली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शाळाच सुरू न झाल्यामुळे केवळ पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त कोणताही खर्च झालेला नाही. यापुढेही करोनाचा प्रादुर्भाव राहण्याची शक्‍यता असल्यामुळे शाळा सुरू होणार की नाही याबाबत साशंकता असल्यामुळे यावर्षीची बहुतांश खरेदी होण्याची शक्‍यता कमीच असल्याने अत्यावश्‍यक गरजेच्या वस्तू वगळल्यास शिक्षण विभागाचे चाळीस कोटींहून अधिक रक्कम शिल्लक राहण्याची शक्‍यता आहे.

प्रयोग फसला
शिक्षण मंडळासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीमध्ये काही प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ठेकेदारांचे आर्थिक लागेबांदे असल्यामुळे “थेट’ पद्धतीने पुर्नप्रत्ययी आदेशाद्वारे 3 कोटी 80 लाखांचे साहित्य खरेदी करण्याचा प्रयत्न सप्टेंबर महिन्यात फसला होता. त्यानंतर सध्या हे प्रकरण न्यायालयात असून 5 जानेवारी 2021 रोजी यावर सुनावणी होणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणखी काही कालावधी गेल्यास चालू शैक्षणिक वर्ष संपुष्टात येणार असल्याने ही खरेदी होण्याची शक्‍यता मावळली आहे.

अन्य खरेदीसाठी प्रशासनामध्ये हालचाली
दरवर्षी खरेदीच्या माध्यमातून स्वत:चा आर्थिक फायदा साधणाऱ्या मंडळींनी सध्या प्रशासकीय पातळीवर खरेदीसाठी धावपळ सुरू केली आहे. भांडार विभागाकडून काही दिवसांपूर्वी कोटेशन मागविले होते. त्या कोटेशनवरून सध्या निविदा प्रक्रिया काढली जाण्याची शक्‍यता असून त्याद्वारे पालिकेला दहा कोटींहून अधिक रुपयांचा “भुर्दंड’ देण्याची प्रक्रिया तेजीत आहे. मात्र या खरेदीविरोधात काही जणांनी न्यायालयात जाण्याची तयारी केल्यामुळे ही खरेदीदेखील न्यायालयीन प्रक्रियेत “लटकण्याची’ शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

शाळा सुरू नसताना
वॉटर बॉटल खरेदीसाठी धावपळ
सध्या शाळा बंद असल्या तरीही तब्बल 40 हजार वॉटरबॉटल खरेदी करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या पातळीवर सुरू आहे. एकाही पालकाने मागणी केलेली नसताना काही ठेकेदारांना “जगविण्यासाठी’ सुरू असलेली धडपड कोणाच्या फायद्यासाठी चालविली आहे? असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. या शैक्षणिक वर्षाऐवजी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये वॉटर बॉटल खरेदी कराव्यात असा मतप्रवाह सध्या सुरू आहे. मात्र आर्थिक हिताच्या दृष्टीकोनातून याबाबत नेमका अंतिम निर्णय काय घेतला जाणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

महापालिका माध्यमिक विभागाकडून यंदा केवळ पुस्तकांची बालभारतीकडून थेट पद्धतीने खरेदी करण्यात आलेली आहे. त्यावर झालेला 21 लाख 99 हजार रुपयांचा खर्च वगळता शालेय साहित्य खरेदीसाठी अन्य खर्च करण्यात आलेला नाही.
– पराग मुंढे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.