भाजपाकडून संघटनात्मक बांधणीवर भर
बारामती – भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा प्रभारी म्हणून नवनाथ पडळकर यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा बदल केलेला आहे.
राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटलेला आहे. त्यातच बारामती लोकसभा क्षेत्रातील इंदापूर येथे झालेला ओबीसी एल्गार महामेळावा राज्यभर गाजला. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नवनाथ पडळकर यांच्या रूपाने ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे, असे दिसून येत आहे.
बारामती लोकसभा मदारसंघ हा ओबीसी बहुल आहे. त्यातही धनगर समाजाचे मतदान लक्षणीय आहे. विशेष म्हणजे नवनाथ पडळकर हे 2019 च्या लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यांच्यापाठी बारामती लोकसभेच्या अनुभवाची शिदोरी आहे. पडळकर यांची प्रभारी पदी नियुक्ती करुन भारतीय जनता पक्षाने बारामती जिंकण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
मुळातच या मतदारसंघात 2014 आणि 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना झुंजवले होते. भाजपच्या कमळावर येथे आजवर पाच लाखांहून अधिक मतदार झालेले आहे. त्यात अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट सोबत आल्यामुळे जिंकण्यासाठी लागणारे मार्जिन मतदान आम्ही सहजपणे मिळवून मोठ्या फरकाने बारामती लोकसभा जिंकू अशा प्रकारची भूमिका नवनाथ पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी बारामती शहराध्यक्ष सुजित वायसे, माळेगाव मंडल अध्यक्ष प्रमोद तावरे, युवा मोर्चाचे सरचिटणीस वैभव सोलनकर, बारामती सरचिटणीस प्रमोद डीबळे, युवा अध्यक्ष साळुंखे आदी उपस्थित होते.