कोपरगाव – सत्तेची हाव किती असावी याला देखील काही मर्यादा असतात. परंतु ज्यांचा चार वर्षांपूर्वी पराभव होवूनही स्वत:ला विद्यमान आमदार समजणाऱ्या कोल्हेंना त्यांच्याच लायकी नसणाऱ्या पाकीटवाल्या अध्यक्षांनी माजी आमदार असल्याचे लक्षात आणून दिल्यामुळे आता या शहराध्यक्षांची लायकी नसताना कोल्हेंना पाकीट वाढवावे लागणार आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांच्यावर केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात आढाव म्हणाले की, माजी आमदार कोल्हे यांनी पाच वर्ष प्रयत्न करूनही त्यांच्याकडून कोपरगाव शहराचा विकास होऊ शकला नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोपरगाव शहरात व्यापारी संकुल उभारण्यासाठी किती निधी आणला, हे पाकीटवाल्या अध्यक्षांनी माजी आमदार कोल्हेंना खासगीत विचारले पाहिजे. तुमच्या काळात व्यापारी संकुलासाठी दमडीचाही निधी आला नाही व एकही व्यापारी संकुल उभे राहू शकले नाही. असे असताना ज्याप्रमाणे संगमनेर बसस्थानकाच्या सभोवताली व्यापारी संकुल उभारण्यात आले,
त्याप्रमाणे कोपरगाव बसस्थानक देखील उभारले जावून व्यापारी संकुलाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीवाढ होईल, अशी कोपरगावकरांना अपेक्षा होती. मात्र, माजी आमदार कोल्हेंनी हे बसस्थानकच चुकीचे बांधल्यामुळे शहरातील व्यवसायवाढीला चालना मिळाली नाही. त्यामुळे कोपरगावच्या बाजारपेठेबाबत माजी आमदार कोल्हे किती गंभीर होत्या हे कोपरगावची जनता जाणून आहे. त्यामुळे २०१९ ला त्यांना कोपरगावकरांनी सरप्राईज गिफ्ट दिले आहे, परंतु सत्तेच्या हव्यासापोटी त्यांचा पराभव त्या आजपर्यंत पचवू शकल्या नाही.