जुन्नर -ग्रामीण भागातील पहिल्या ऑलिम्पिक मेडलची पायाभरणी व्हावी, या उद्देशाने स्थापित करण्यात आलेल्या बारामती स्पोर्टस फाउंडेशनच्या सदस्यांनी शनिवारी (दि. 12) किल्ले शिवनेरीवर भेट दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून या फाउंडेशनच्या 350 गडकिल्ल्यांना सायकलिंग करत भेट देण्याच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे 70 सदस्य बारामतीहून सुमारे 200 किलोमीटरची सायकलवारी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक झाल्याची माहिती सतीश ननावरे यांनी दिली.
यावेळी इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी ऐतिहासिक घटनांचे दाखले देत महाराजांचा जीवनपट उलगडून सांगितला. या टीममध्ये 16 महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि 65 वर्षीय पटेलकाका यांचा समावेश होता.
अतुल बेनके युवा मंच जुन्नर तालुक्याच्या वतीने सायकलस्वार आणि त्यांच्या समवेत आलेल्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी नगरसेवक भाऊ कुंभार, रुपेश शाह, जितेंद्र चौधरी, बाळासाहेब सदाकाळ, धनंजय माताडे, गणेश पुरवंत, शंकरकाका कचरे, सुनील इचके उपस्थित होते.