सोमनाथ भाकरे, आनंद भाकरे यांची निवड
टाकळी हाजी – शिरूर तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सोमनाथ भाकरे यांच्या परिवर्तन पॅनलने 6-1 असा दणदणीत विजय संपादित केला होता. त्यामुळे सरपंचपदाची माळ अखेर सोमनाथ भाकरे यांच्या गळ्यात पडली. आनंद भाकरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर माळवाडी ग्रामस्थांनी जल्लोष केला.
माळवाडी ग्रामपंचायत विभक्त होण्यासाठी केलेले प्रयत्न, समाजाबरोबर असणारे जिव्हाळ्याचे संबंध, तरुणवर्गावर असणारी छाप, मनमिळावू स्वभाव आदी कारणांमुळे तरुण वर्गाचा भरभरून प्रतिसाद निवडणुकीत प्रामुख्याने दिसून आला.
दरम्यान, माळवाडी ग्रामपंचायत निवडणूक चुरशीने झाली. या निवडणुकीकडे संपूर्ण शिरूर आणि आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागले होते. यात भाकरे यांच्या पॅनलने बाजी मारत ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापीत केली आहे. त्यामुळे अखेर भाकरे हे सरपंचपदावर विराजमान झाले.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संचालकांचे अभिनंदन माजी आमदार पोपटराव गावडे, टाकळी हाजीच्या नवनिर्वाचित सरपंच अरुणा घोडे, माजी सरपंच दामूशेठ घोडे, पंचायत समितीचे सदस्य डॉ. सुभाष पोकळे, प्रभाकर गावडे, अध्यक्ष दौलतराव भाकरे, नवनाथ रसाळ, ग्रामस्थांनी केले.