वासुदेव, आंधळा पांगळा, जगजोगी, अभंग, गवळण, देवीची आणि पांडुरंगाची आरती
मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथे आदिशक्ती कमलजादेवी माता मंदिरात कोजागरीपासून काकड आरती सोहळ्याला सुरुवात झाली आहे. कळंब, एकलहरे, वर्पेमळा, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, महाळुंगे, साकोरे, चास, चांडोली,लौकी आदी परिसरातील गावांमध्ये काकड आरती सोहळ्याची परंपरा अखंडित असल्याचे दिसून येत आहे .
काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. यावेळी देवीच्या मूर्तीला काकड्याने एक प्रकारची ज्योत ओवाळली जाते, म्हणून याला काकड आरती असे म्हणतात. बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात विशेषता कार्तिक महिन्यात काकड आरती केली जाते, अशी माहिती हभप सुरेखा शिंदे यांनी दिली आहे.
दररोज काकड आरतीसाठी हभप सुरेखा शिंदे, मंगल थोरात, अंजना कानडे, विणेकरी सुलोचना कानडे, शिक्षिका सीमा कहडणे, हभप प्रशांत गुरव, पखवाज वादक गोरख जगदाळे, नितीन पवार, शुभंकर शिंदे यांसह ग्रामस्थ पुढाकार घेऊन काकड आरतीचा कार्यक्रम पहाटे चारपासून ते साडेपाच वाजेपर्यंत करीत असतात.
काकड आरतीच्या कार्यक्रमात वासुदेव, आंधळा पांगळा, जगजोगी, अभंग, गवळण, देवीची आरती, पांडुरंगाची आरती होऊन काकडा याची समाप्ती होते. काकड आरतीसाठी उपस्थित महिलांना रोज चहाची व्यवस्था लक्ष्मीबाई पवार पाहतात. महिलांना पहाटे मंदिरापर्यंत ने-आण करण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक रामदास शिंदे मदत करतात. कमलजादेवी मंदिराभोवती शेणाने सारवून रांगोळी काढण्याचे काम सुलोचना कानडे हे गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत.