नारायणगाव -नारायणगाव ग्रामपंचायत व सरपंचांनी साडेतीन वर्षात फक्त तोडा आणि फोडा असे राजकारण केले. साडेतीन वर्षात कोणते भरीव काम केले ते सांगावे. सत्ताधाऱ्यांकडे कोणताही विकासाचा अजेंडा नाही. डुक्कर व प्लॅस्टिकमुक्त नारायणगाव करण्याचा निवडणूक अजेंड्याचे काय झाले? असा सवाल माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर कोऱ्हाळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
कोऱ्हाळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नारायणगावातील विविध समस्यांविषयी माहिती दिली. यावेळी माजी सरपंच अभिमन्यू सुर्वे, अशोक जंगम, सुभाष मेहेत्रे, गणेश तांबे , हितेश कोऱ्हाळे गौतम औटी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोऱ्हाळे म्हणाले, माजी सरपंच यांच्या काळात झालेली विकासकामे विद्यमान सरपंच तोडफोड करीत आहेत. गावात रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पाण्याची समस्या आहे. अद्ययावत असलेले स्मशानभूमीची भिंत पडून देव देवतांच्या मूर्ती काढल्या. विठ्ठल विसावा असलेला विठ्ठलाचा पुतळा काढण्याच्या प्रयत्न सुरु आहे.
कोविडच्या काळात नारायणगावचा व्यापार, बाजारपेठ संपवली. इतर गावांमध्ये, तालुक्यात बाजारपेठा सुरु असताना नारायणगावात सर्व बंद ठेवण्यात आले. नारायणगाव पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहायक निरीक्षक यांच्या मदतीने व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला व्यापारी नारायणगाव सोडून जायला लागले. खोडद रस्त्यावर खूपच खड्डे पडले, शिवविहार रस्ता ते ब्रम्हकुमारी रस्ता गेली तीन ते चार महिन्यांपासून खोदून ठेवला आहे.
त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास होत आहे. महिलांना त्रास होतोय. कचऱ्याच्या गाड्या नवीन आहेत की जुन्या, पिकअप नव्या आहेत; मात्र छोट्या दोन गाड्यांचे कसे? डोळे हॉस्पिटलच्या मागे असलेली गायरान जागा ताब्यात घेतली. त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे.
तहसीलदारांनी परवानगी दिलेल्या कोविड हॉस्पिटलला ग्रामपंचायतने परवाना दिला नाही. आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाला प्रतिसाद दिला नाही. गावात खाजगी गॅस पाइपलाइनही चुकीची आहे. स्वतःचा पंप उभारायचा इरादा आहे. लोकांनी यांना भावनेच्या भरात निवडून दिले. डुक्करमुक्त नारायणगाव, प्लास्टिकमुक्त नारायणगाव करू बोलले मग आता वेळ आली आहे. एखादं ठोस काम सांगा यांनी काय केलं? नचुकीच्या कारभाराबद्दल ग्रामविकास मंत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याच्याकडे तक्रारी केल्या आहेत.
विद्यमान कारभारी यांची उत्पन्नाची साधने सांगा. याला नड, त्याला नड हा यांचा धंदा आहे. कोल्हेमळा येथील कुबेर मधुकोश सोसायटीतला 105 नंबरच्या फ्लॅटची 8अ ला सुलभा चंद्रशेखर कोऱ्हाळे नावाची नोंद असताना सुरेखा कहाणे यांची नोंद ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी कशी केली? लाइटबिल, मेंटेनन्स आम्ही भरतो. याबाबत पोलिसात तक्रारही केली आहे.