उपचारा दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू : 121 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – शुक्रवारी शहरातील 161 तर शहराबाहेरील 12 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच गेल्या 24 तासांत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक रुग्ण शहरातील असून शहराबाहेरील तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत 161 रुग्णांना करोनाची लागण झाल्याने शहरातील आतापर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या 87594 झाली आहे. तसेच 121 बाधित करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण बाधितांपैकी 84246 जणांनी करोनावर मात केली आहे.
शुक्रवारी झालेल्या चार करोना मृत्यूंमुळे शहरातील एकूण करोना मृत्यूंची संख्या 1527 झाली आहे तर शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांच्या मृत्यूची संख्या 630 झाली आहे. अशा प्रकारे शहरात करोनामुळे 2157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी करोना तपासणीसाठी महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये 2206 संशयित दाखल झाले होते. तसेच गेल्या दोन दिवसांत 1707 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 1138 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. सध्या रुग्णालयात 947 करोनाबाधित उपचार घेत असून 194 शहराबाहेरील रुग्णांवरही महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
करोनाची रुग्णसंख्या घटत असली तरी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.