न्हावरे – इनामगाव (ता. शिरूर) येथील नलगेमळ्यातील शेतकरी चंद्रकांत कचरू थोरात यांच्या एका शेळीला बिबट्याने हल्ला करून फडशा पाडला. ही घटना गुरुवारी पहाटे साडेचार वाजता घडली. पहाटे चार वाजता शेळी ओरडल्याचा आवाज आल्याने शेतकरी थोरात यांनी गोठ्यात जाऊन पहिले असता त्यांच्या गोठ्यातील एक शेळीवर बिबट्या हल्ला करीत होता.
थोरात यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने शेळीला सोडून पळ काढला. दरम्यान, बिबट्याने हल्ला केल्याची माहिती थोरात यांनी वनविभागाला दिली. वनसेवक नवनाथ गांधले यांनी पंचनामा केला आहे. नलगेमळा येथे तीन दिवसात शंकर रामचंद्र गोरे यांच्या सात कोंबड्या, सोमनाथ कचरू थोरात यांच्या कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला आहे.
नलगेमळा परिसरात आठ दिवसांपासून बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत आहे. परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून पाळीव प्राण्यावर हल्लासत्र सुरु आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पिंपळसुट्टी येथे दोन शेळ्या व एक बकरे, गणेगाव दुमाला येथे एक शेळी व एका बकरीला बिबटयाने ठार केले होते. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी धास्तावला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. या परिसरात बिबट्याच्या डरकाळ्या वाढल्या आहे. दिवसाही बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी चंद्रकांत थोरात यांनी केली आहे.