सतरा वर्षांची शिक्षा एकत्रित : न्यायालयाचा आदेश
लोणी काळभोर – इयत्ता ५ वीत शिकणा-या दहा वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीवर सहा महिने बलात्कार करुन कुणाला सांगितल्यास मुलीला व तिच्या आई वडिलांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका तरुणाला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश श्रीमती एस. पी. पोंक्षे यांनी मरेपर्यंत जन्मठेप व वेगवेगळ्या कलमान्वये एकूण १७ वर्षे सक्तमजुरी तसेच ६५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या आहेत.
या संदर्भात पीडीत मुलीच्या आईने पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा फेब्रुवारी ते जुलै २०२१ दरम्यान घडला होता. आरोपी तरुणाने पीडीत मुलीला स्वतः च्या घरी नेऊन वारंवार बलात्कार केला होता. आरोपीला बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अन्वये मरेपर्यंत जन्मठेप व तीस हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम १० अन्वये सात वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंड,
दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम १३ अन्वये ३ वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद, विनयभंग कायदा अन्वये ५ वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रु दंड, दंड न भरलेस १ महिना साधी कैद, भारतीय दंड संहिता ५०६ अन्वये २ वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रु दंड, दंड न भरलेस १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपीने ६५ हजार रुपये दंड भरल्यावर ही रक्कम पीडितेला देण्यात यावी असा आदेश न्यायालयाने दिला आहेत.
उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली खटला
गुन्ह्यात विशेष सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज रद्द केला होता. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तक्रार मागे घ्यावी म्हणून आरोपीच्या नातेवाईकांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबावर दबाब टाकला होता. ही बाब उच्च न्यायालयाच्या लक्षात आली. त्यामुळे उच्च न्यायालयाने खटल्याची तत्काळ दररोज सुनावणी घेण्याबाबत आदेश दिले होते.
हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली ठेवले होते. एक महिन्याच्या आत निकाल दिला आहे. सरकारी वकील विद्या विभुते, पौड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार, सहायक फौजदार विद्याधर निचित, अल्ताफ हवालदार यांनी मेहनत घेतली आहे.