रांजणगाव एमआयडीसीत आर्थिक फसवणूक : तरूणांच्या स्वप्नाचा चुराडा
जिल्ह्यात राज्यात गंडा घालणारी टोळी सक्रिय
रांजणगाव गणपती – देशातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहतीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक युवक आणि युवतींची मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्यांमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने लूट केली जात आहे. यावर माहिती दिली जात आहे. नोकरीच्या शोधात राज्यासह देशभरातून आलेल्या तरूणांच्या स्वप्न भंगले जात आहे. यात तरूणांची ससेहोलपट होत असल्याने संपूर्ण कुटुंब निराशेच्या गर्तेत सापडले आहे.
सध्या महाराष्ट्रातील हजारो बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात आहेत. उच्चशिक्षित तरुणांना चांगल्या पगाराची नोकरी भेटत नाही. म्हणून मिळेल ती नोकरी स्वीकारुन ते काम करतात. याचाच फायदा घेत पुण्यातील काही प्लेसमेंटवाल्या टोळीने घेतला असून नोकरी संदर्भात छोट्या जाहिरातीत रोज एक जाहिरात येते. जाहिरातीतील मजकूर रांजणगाव एमआयडीसीत कंपनीत पर्मनंट भरती सुरु आहे, असा आहे. पात्रता १० वी व १२ वी कोणतीही पदवी आवश्यक आहे. पगार, जेवण, संपर्क असा मजकूर असतो.
त्या नंबरवर कॉल केला तर एक महिला बोलते. ती जाहिरातीतील माहितीच कॉल वर सांगते. बाकीची माहिती तुम्हाला इथे आल्यावर सांगितली जाईल, असे म्हणते. येताना २००० रुपये आणि २ पासपोर्ट साईज फोटो आणि ओळखपत्र घेऊन या, हे न विसरता सांगितले जाते. पत्ता विचारला असता रांजणगावला उतरल्यावर कॉल करा. आम्ही तुम्हाला घ्यायला येतो असे सांगितले जाते. नोकरीची गरज असलेली मुलं त्यांच्या बोलण्यात फसतात. त्यानंतर रांजणगावला गेल्यावर प्लेसमेंटवाल्यांना कॉल केला की, गणपती मंदिरासमोर हायवेवर थांबा, असे फर्मान सोडले जाते. १० मिनिटांत त्यांची एक व्यक्ती गाडीवर येते. पैसे घेऊन जाते. ऑफिसचा पत्ता विचारल्यावर पैसे द्या लगेच जॉइनिंग करुन घेतो, असे सांगून टोलवाटोलवी करीत आहे. आता दूरवरून आलेल्या युवकांना नोकरीची गरज असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागत आहे.
गरजू युवकांची अशी फसवणूक
संबंधित व्यक्ती त्यांना गाडीवर घेऊन रांजणगावच्या एका चौकात नेतो. तिथे तो २ हजार रुपये आणि फोटो, ओळखपत्र घेतो. त्याला पावती मागितली असता संध्याकाळी तुमच्या रुमवर आणून देतो, असे सांगितले जाते. आमचा दुसरा एक व्यक्ती येईल आणि तुम्हाला तुमच्या रूममध्ये घेऊन जाईल. असे सांगत पहिला व्यक्ती जातो. ५ मिनिटांत तो दुसरा व्यक्ती येतो. तो विद्यार्थ्याला घेऊन त्याच चौकातून ५ ते ६ किमी अंतरावरील एका खेडेगावात घेऊन जातो. तिथे गेल्यावर तुमची राहायची व्यवस्था मी केली आहे, असे सांगून बळजबरीने युवकांकडून तो ५०० रुपये घेतो.
युवकांचा भ्रमनिरास.
नोकरीची गरज असलेल्या युवकांना फसवणूक झाल्याचे लक्षात येते. पण गावापासून दूर असल्यामुळे त्यांचा नाईलाज होतो. तिथे पहिल्यापासुनच अशीच फसवणूक झालेले काही युवक असतात. काहीच पर्याय नसल्यामुळे ते तयार होतात. त्यांनी एकमेकांची विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर येत आहे. लातूर, धुळे, औरंगाबाद, सोलापूर आदी जिल्ह्यातून जाहिरात वाचून तेसुद्धा आलेले आहेत. कोणाकडुन तीन हजार तर कोणाकडून पाच हजार घेतलेले आहेत. यात मोठी टोळी सक्रिय झाली आहे.
ट्रेनिंगच्या नावाखाली पत्र्याच्या शेडमध्ये काम
सर्व युवकांना ट्रेनिंगच्या नावाखाली एका पत्र्याच्या शेडमध्ये काम करायला लावले जाते. त्या युवकांच्या लक्षात येत की, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला लावण्याच्या नावाखाली मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या विरोधात कोणी आवाज उठवला तर त्याला स्थानिक गुंडाकडुन बेदम मारहाण केली जात आहे. त्यामुळे हे तरूण घाबरुन अनेक युवक रात्रीच आपला पसारा आवरुन थेट घर गाठतात.
रांजणगाव पोलिसांची गांधारी भूमिका
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत इतका लुटीचा सिलसिला सुरू असतानाही पोलीस प्रशासन जाणीवपुर्वक याकडे डोळेझाक करीत असल्याचे काही फसवणूक झालेल्या युवकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ठेकेदाराने आमचे पगाराचे पैसे बुडवल्याने आम्ही पोलिसांकडे तक्रारही केली. परंतु पोलिसांनी म्हणावी तशी दखल घेतली नाही. उलट फक्त आज ये, उद्या ये, परवा ये, असे करीत ‘तारीख पे तारीख’ दिल्याने शेवटी आम्ही तिकडे जाणेच बंद केले, असे त्यांनी केविलवाणपणे सांगितले.