तुम्ही आमचे नाही तर निवडणुकीत आम्हीही तुमचे नाही ः शेतकरी दाखवून देणार
सोरतापवाडी – मांजरी उपबाजारात दुबार विक्री व खोतेदार पद्धतीला शेतकर्यांचा तीव्र विरोध असून काही अटी व शर्तीवर संचालकांनी खोतेदार पद्धतीला परवानगी दिली आहे. त्याला शेतकर्यांनी तीव्र विरोध केला आहे. मांजरी उप बाजारात हजारो शेतकर्यांनी या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले असून, त्याला महिला शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, रयत क्रांतीचे पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर यांच्या नेतृत्वाखाली बाजार आवारात हे शेतकरी दररोज विविध प्रकारचे आंदोलने करणार आहेत. याविषयी बोलताना सुदर्शन चौधरी यांनी सांगितले की, हा बाजार शेतकरी आणि ग्राहक असुन येथे दुबार विक्री व खोतेदार पद्धत येथे लागु नाही.
या आंदोलनात हवेली तालुक्यातील व शेजारील तालुक्यातील शेतकर्यांची एकी बघायला मिळाली. दहा हजार शेतकर्यांच्या सह्या घेऊन या निर्णयाच्या विरोधात पणन संचालक व कोर्टात अपील करणार आहे. शेतकरी आपापल्या गावातील गाव पुढार्यांना या आंदोलनात सामील होण्याचे आव्हान करणार असून जे यात सामील होणार नाही त्यांना तुम्ही आमचे नाही तर निवडणुकीत पण आम्ही तुमचे नाही हे दाखवून देणार आहे. असे अनेक शेतकर्यांनी सांगितले.
हे मार्केट शेतकर्यांचे असून येथे शेतकरी जगला पाहिजे. येथे व्यापारी छोट्या-मोठ्या शेतकर्यांच्या मध्ये वाद लावत असून काही ठराविक मोठे शेतकरी या वादाला बळी पडले असून त्यामुळे त्यांचेच नुकसान होत आहे. तरी छोटा मोठा वाद न लावता फक्त हा बाजार शेतकर्यांचाच आहे याचे भान सर्वांनी ठेवावे.
-कमलेश काळभोर, शेतकरी
संचालक मंडळांनी जर व्यापार्यांना बाजारात घुसण्यास परवानगी दिली तर शेतकरी रस्त्यावर शेतीमाल विकणार आहे. जर वाहतुकीला अडथळा झाला तर त्याला सर्वस्वी मार्केट कमिटी जबाबदार राहील.
-सूर्यकांत काळभोर, जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना