पुणे जिल्हा: जुन्नरच्या पूर्व भागात शेतांचे तळे

बेल्हे -जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात बुधवारी (दि. 16) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पावसाला जोरदार सुरुवात झाली. एक ते दीड तास हा पाऊस जोरदार बरसल्याने शेतांमध्ये पाणी साचल्याने तळ्याचे स्वरुप आले होते.

या पावसाने बांगरवाडी, बेल्हे, राजुरी, आळे, निमगाव सावा, साकोरी, पारगाव, मंगरूळ, आणे, पेमदरा, नळवणे, गुळंचवाडी, बोरी, जाधववाडी, तांबेवाडी व परिसरातील ओढे, नाले खळखळून वाहू लागले. बांगरवाडी, साकोरी, मंगरूळ परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने रानदेवीवस्ती व बांगरमळ्याला जोडणाऱ्या पुलावरून पाणी जात असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

पुलाचा बराच भाग वाहून गेला आहे. तर बेल्हे-मंगरूळ रस्त्यावरील पर्यायी मार्ग पाण्याखाली गेला असून या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. बेल्हे बसस्थानकाजवळील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी बंद होती.

परिसरातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून बाजरीचे पिक भुईसपाट झाले आहे. तर काही ठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले असून शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. या सतत पडणाऱ्या पावसाला शेतकरी वर्ग त्रासला आहे “येरे येरे पावसा, म्हणण्या पेक्षा जा रे जा पावसा’ म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.