राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा अल्टिमेटम : सात दिवसांची मुदत
लोणी काळभोर- पुणे – सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी (ता. दौंड) या दरम्यान वारंवार होणारे अपघात व या मार्गावरील सततची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंबर कसली आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या आठवड्यात कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी (ता. दौंड) या दरम्यानच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात होणार आहे.
महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजूस १५ मीटरच्या आत असलेली अतिकमणे हटविण्यात येणार आहेत. उरुळी कांचन, लोणी स्टेशन, कुंजीरवाडीसह महामार्गावर अतिक्रमण हटविण्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकारी कार्यालय, शहर पोलिसांच्यासह जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे मदत मागितली आहे.
राजमार्ग प्राधिकरणाने मागील वर्षी पुणे – सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ते कासुर्डी या दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे हटविली होती. मात्र, वर्षभरात दोन्ही बाजूला मागील वर्षीच्यापेक्षाही जादा अतिक्रमणे वाढली आहेत. रस्त्याकडेला व्यावसायिक दुकाने असलेल्या इमारती उभारल्याने, वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकात मागील काही दिवसापासुन सातत्याने कोंडी होत असल्याने, नागरीकांच्या मोठ्या रोषाला सामोरी जावे लागत होते.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, वाहतुक पोलिस व स्थानिक ग्रामपंचायतींनी यातुन मार्ग काढावा यासाठी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुढील आठवड्यात कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी (ता. दौंड) या दरम्यानच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात होणार आहे.
सात दिवसांत कारवाई होणार
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, कवडीपाट ते कासुर्डी रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजूस १५ मीटरच्या आत असलेली अतिकमणे ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून सात दिवसांत स्वखचर्चाने त्वरित काढून घेण्यात यावीत असशी विनंती प्राधिकऱणाने केली आहे. सात दिवसांत अतिक्रमणे न हटविल्यास, त्याचा खर्च व दंड संबधित मिळकत धारकाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही कळविले आहे.