लोणी धामणी -मांदळेवाडी (ता. आंबेगाव ) व ढगेवाडी (ता. शिरूर) या दोन गावांच्या शिवेवर असणाऱ्या रेणुका माता मंदिराच्या कळसावर गुरुवारी (दि. 17) पाच वाजता वीज पडून उभी भेग पडली आहे, यामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती युवराज गायकवाड, दादा खर्डे यांनी दिली.
मांदळेवाडी (ता. आंबेगाव ) व ढगेवाडी (ता. शिरूर) या दोन गावांच्या शिवेवर असणारे रेणुकामातेचे पुरातन मंदिर आहे या मंदिराचा लोकवर्गणीतून नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला असून, अतिशय सुबक असे मंदिर बांधण्यात आले आहे.
मात्र गुरुवारी (दि. 17) पाच वाजण्याच्या सुमारास पाऊस व विजेचा कडकडाट सुरू झाला आणि याच वेळी मंदिराच्या कळसावर वीज पडून मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. येथील ग्रामस्थ बऱ्याचदा मंदिराजवळ असतात; पण सुदैवाने यावेळी तेथे कोणी नव्हते.
मंदिरावर पडलेली वीज हे नैसर्गिक संकट असून, सरकाराने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बाबूराव खर्डे, अप्पा मांदळे, अंकुश खर्डे, सोपान आदक गुरुजी यांनी केली आहे.