उत्सवाच्या काळात 52 हजार कोटींची उलाढाल अपेक्षित
नवी दिल्ली – यावर्षी उत्सवाच्या काळात ई-कॉमर्सच्या माध्यमातून 7 अब्ज डॉलरची म्हणजे 52 हजार 500 कोटी रुपयांची उलाढाल भारतात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी उत्सवाच्या काळात केवळ 3.8 अब्ज डॉलरची उलाढाल झाली होती.
रेड सिर या संस्थेने सध्याच्या परिस्थितीत उत्सवाच्या काळात किती उलाढाल होईल याचा अभ्यास केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, गेल्या वर्षी परिस्थिती नियमित होती. त्यामुळे बरीच खरेदी थेट दुकानात जाऊन केली गेली. मात्र, यावर्षी कोविड-19 या आजारामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहक जास्तीत जास्त खरेदी ई-कॉमर्सवरून करण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर या पूर्ण वर्षात ई-कॉमर्सवरून खरेदी वाढून 38 अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 27 अब्ज डॉलरची खरेदी झाली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी संसर्गाच्या भीतीने ग्राहक जास्त प्रमाणात ई-कॉमर्सचा वापर करण्याची शक्यता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. बऱ्याच ग्राहकांना वेबसाइटवरून खरेदी करता येत नाही. यासाठी ई-कॉमर्स कंपन्या व्हिडिओ आणि व्हॉट्सऍप्वर आधारित ऑर्डर घेण्याची पद्धत विकसित करण्याची शक्यता आहे. तसे झाले तर सर्वसामान्य लोकही ई-कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी करतील.
स्वदेशी वस्तूंची खरेदी वाढेल
केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत धोरण जाहीर केले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांमध्ये देशातील वस्तू खरेदी करण्याची इच्छा वाढली आहे. या परिस्थितीत या वर्षी उत्सवात खरेदी करताना लोक देशांतर्गत निर्मित वस्तूंची खरेदी करण्यास प्राधान्य देण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली.