रेडा -इंदापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी (दि. 8) डिसंबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे. त्या गावातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसून येत आहे.
नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल हाती येताच बदलाचे वारे गावागावांत वाहू लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मीच भावी सरपंच अशा वल्गना तरूणांईमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. ईर्शतुन सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सध्या निवडणूक आयोगाकडून सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे,या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कालावधी संपुष्टात आला होता. करोनामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे आता सरपंच पदाचे आरक्षण सोडतीनंतर तात्काळ निवडणूक लागणार आहे. हळूहळू करोना संसर्ग कमी होत असल्यामुळे हा निर्णय शासनाने घेतला आहे. कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या वर्गाचे आरक्षण निघते, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
इंदापूर तालुक्यातील सरपंच पदासाठी सोडत (दि. 8) डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 2020 ते 2025 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला आहे. आरक्षण सोडतीवेळी काढण्यात आलेले आरक्षण सन 2020 ते 2025 या मुदतीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी लागू राहणार आहे.
अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. इंदापूर तालुक्यासाठी आरक्षण सोडत मंगळवारी सकाळी 11 वाजता इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. तरी या आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांना उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.
गावागावांत मोर्चे बांधणी सुरू
अनेक दिवसांपासून तालुक्यात अनेक तरुण मंडळींनी सरपंच पदाची स्वप्ने रंगवली आहेत. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याने गावातील गटतट व पक्ष यांनी निवडणूकीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे. तरूणाईही आपली ताकद आजमावून निवडणूकीच्या रणांगणात उतरू लागली आहे. लॉकडाऊन काळात केलेली मदत, तसेच आता लागलेले सोडतीकडे लक्ष याबाबत तरूणवर्ग सरसावू लागला असल्याचे दिसून येत आहे.