असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची पाहणी
बारामती – बारामती एमआयडीसीमध्ये कचऱ्याची समस्या दिवसोंदिवस गंभीर होत आहे. यावर दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. बारामती इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट असोसिएशनने कचरा समस्येवर मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मोठ्या कंपन्या, लघुउद्योजक, कामगार, एमआयडीसी व पोलीस प्रशासन, बारामती नगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींच्या सहकार्य व सहभागाने सामूहिक प्रयत्न करून निश्चित मार्ग काढला जाईल, असा विश्वास बारामती इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी व्यक्त केला. बारामती एमआयडीसी अंतर्गत क्षेत्रात कचऱ्याची ठिकाणे पहाणी दौरा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.
दौऱ्यात एमआयडीसीचे उपअभियंता विजय पेटकर, बारामती इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, चंद्रकांत नलवडे, विष्णू दाभाडे, महावीर कुंभारकर, बिडाचे व्यवस्थापक माधव खांडेकर, टेक्स्टाईल पार्कचे अनिल वाघ आदी सहभागी झाले होते.
जामदार म्हणाले की, अनेक लहान- मोठ्या उद्योग व्यावसायिकांकडून निकामी प्लास्टिक, रबर, लाकूड, काच, कागद, वंगण तेल, पॅकिंग मटेरियल, घातक रसायने, टाकाऊ खाद्यपदार्थ आदी स्वरूपाचा कचरा एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांच्या कडेला बिनधास्तपणे फेकला जात आहे. एमआयडीसीबाहेरील अनेक हॉटेल व इतर उद्योग व्यावसायिक, नागरिक व कामगार त्यांचा सर्व प्रकारचा कचरा क्षेत्रात टाकून जात आहेत. कचयाची विल्हेवाट लावण्यासाठी अनेकदा तो पेटवून दिला जातो. यातून प्रचंड धूर, विषारी वायु उत्सर्जित होऊन पर्यावरण व आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
उपअभियंता पेटकर म्हणाले की, बारामती इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट असोसिएशनने महत्त्वाचा प्रश्न हाती घेतला असून उद्योजक, नगरपालिका व एमआयडीसीच्या एकत्रित प्रयत्नातून कचरा समस्येवर मार्ग काढला जाईल.