वसंत हंकारे : विद्यार्थ्यांना बाप समजला
टाकळी हाजी – मोबाइलमुळे अनेक नाती संपुष्टात आली आहेत. प्रत्येकाचे जीवनमान धकाधकीचे झाले असले तरी मुलांनी आई-वडिलांसोबतचे नाते दृढ करावे, असे मत प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे बापूसाहेब गावडे विद्यालयात ‘बाप’ समजावून घेताना संघर्षाकडून यशाकडे या विषयावर विद्यार्थी आणि पालकांसाठी हंकारे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. माजी विद्यार्थी विकास घोडे, स्वप्निल गावडे, भरत घोडे, शरद घोडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
हंकारे यांनी व्याख्यानात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना शब्दांची चौफेर उधळण करीत खळखळून हसवले आणि रडवलेही. मुलांनी कोणत्याही परिस्थितीत पालकांशी प्रामाणिक राहिले पाहिजे, हा बोध व्याख्यानातून मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आदर्श शिक्षक बाळासाहेब घोडे, पत्रकार विजय थोरात आणि ॲड. भरत खाडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, संस्थेचे सचिव राजेंद्र गावडे, शिरूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मनिषा गावडे, व्हाइस चेअरमन खंडू जाधव, प्राचार्य, आर. बी. गावडे, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.